बनावट प्रमाणपत्रप्रकरणी नाशिकच्या डॉक्‍टरला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

मुंबई - पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण झाल्याची बनावट कागदपत्रे सादर करून बेकायदा नोंदणी करणाऱ्या 58 डॉक्‍टरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यात पाच एमबीबीएस, 52 स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शल्यविशारद आदींचा समावेश आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी शनिवारी (ता. 10) नाशिकमधील एका डॉक्‍टरला अटक केली आहे. 

परळ येथील कॉलेज ऑफ फिजिशियन्स ऍण्ड सर्जन्स (सीपीएस) या संस्थेतून स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शल्यविशारद आदी विशेष अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रे तयार करून नोंदणी केल्याचा प्रकार मागील वर्षी उघडकीस आला होता. त्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने आग्रीपाडा पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आग्रीपाडा पोलिसांनी नाशिकमधून 46 वर्षांच्या डॉक्‍टरला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयदीप गायकवाड यांनी दिली. त्याने यापूर्वी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात काम केले होते. 

एमबीबीएस झाल्यानंतर आरोपी डॉक्‍टरांनी स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शल्यविशारद आदी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रे मिळवली. परळ येथील "सीपीएस' संस्थेच्या नावाची ही प्रमाणपत्रे असल्याचा आरोप आहे. वैद्यकीय परिषदेच्या पडताळणीत हा प्रकार पुढे आला. त्यानंतर त्यांनी आग्रीपाडा पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी या डॉक्‍टरला अटक केली. अटक केलेल्या डॉक्‍टरने ही बनावट प्रमाणपत्रे इतर डॉक्‍टरांना पुरवल्याचा आरोप आहे. 

टोळीचा शोध सुरू 
याप्रकरणी बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पोलिस शोध घेत आहेत. जून ते ऑक्‍टोबर 2015 या काळात ही फसवणूक झाल्याचा आरोप असून, संबंधित डॉक्‍टरांविरोधात यापूर्वी भोईवाडा पोलिस ठाण्यातही तक्रार करण्यात आली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik doctor arrested on fake certificate