इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 20 जानेवारी 2019

मुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच भारतीय चित्रपटांचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचणार आहे, असे प्रशंसोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. १९) काढले.

मुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच भारतीय चित्रपटांचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचणार आहे, असे प्रशंसोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. १९) काढले.

पेडर रोड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा) उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी झाले. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, खासदार अरविंद सावंत व राहुल शेवाळे, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्यासह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ दिग्दर्शक श्‍याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित होते.

चित्रपट आणि समाज ही एकमेकांचे प्रतिबिंब आहेत. जे समाजात दिसते, तेच चित्रपटात दाखवले जाते; जे चित्रपटात पाहतो, तेच समाजात घडताना दिसते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले कलाकार वैविध्यपूर्ण कलाकृती सादर करत आहेत. चित्रपट म्हणजे बदलत्या समाजाचा आरसा आहे. चित्रपटातून प्रश्‍न कळतात आणि उत्तरेही मिळतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. 

आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी मदत
मुंबई म्हणजे ‘सिनेमा सिटी’ आहे. या महानगरात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सुरू होणे ही महत्त्वाची बाब आहे, असे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड म्हणाले. चित्रपट कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधनही करतात; ही देशसेवाच आहे. भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट शिखर परिषद घेण्याचा केंद्राचा विचार आहे. कान, ऑस्कर आदी महोत्सवांत भारतीय चित्रपटांचे ‘प्रमोशन’ करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: National Museum of Indian Cinema was inaugurated by Prime Minister Narendra Modi on Saturday