सर्व्हर समस्येमुळे ‘एनएटीए’च्या परीक्षार्थींना मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्‍चरची (एनएटीए) परीक्षा नुकतीच वांद्रे येथील थोडामल शहानी अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली; परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना लॉग-ईन करण्यात अडथळा आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबई - नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्‍चरची (एनएटीए) परीक्षा नुकतीच वांद्रे येथील थोडामल शहानी अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली; परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना लॉग-ईन करण्यात अडथळा आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच परीक्षेसाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना अत्यावश्‍यक सुविधाही पुरवल्या नाहीत, असा पालकांचा आक्षेप आहे. या सर्व बाबींचा निकालावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करून पालकांनी महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

‘एनएटीए’ परीक्षेसाठी रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि राज्याच्या ग्रामीण भागातून विद्यार्थी मुंबईत आले होते. या परीक्षेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना मदत केली नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. महाविद्यालयाने या परीक्षेसाठी कोणतीच तयारी न केल्यामुळे विद्यार्थ्यांना साधे चित्र काढण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे दिसून आले.  या परीक्षेसाठी विद्यार्थी दोन वर्षांपासून तयारी करत होते; मात्र महाविद्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना खूप अडचणी आल्या. त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. त्याशिवाय किमान सुविधाही उपलब्ध न केल्याबद्दल महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. महाविद्यालयाच्या बाहेर भोंगळ कारभाराविरोधात पालकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

परीक्षेला तीन तास उशीर
‘एनएटीए’ परीक्षेसाठी विद्यार्थी सकाळी ७ वाजता परीक्षा केंद्रावर हजर झाले. सकाळी १० वाजता सुरू होणारी परीक्षा दुपारी १ वाजेपर्यंत सुरू झाली नाही. काही विद्यार्थ्यांना तर दीड वाजेपर्यंत परीक्षेला बसता आले नाही. त्याबद्दल पालकांनी विचारल्यावर व्यवस्थापनाने उत्तरे देण्यास टाळाटाळ केली.

Web Title: National Optical Test of Architecture exam takers suffer from server problem