नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कामगिरीची देश पातळीवर दखल

नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कामगिरीची देश पातळीवर दखल

मुंबई: देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असा नावलौकिक असणाऱ्या आणि दरवर्षी तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर परिणामकारक दंतोपचार करणाऱ्या पालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सोयी-सुविधा विषयक कामगिरीची दखल एकाचवर्षी 3 राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे. नायर दंत महाविद्यालय देशात 5 वे, तर सार्वजनिक क्षेत्रात 3 रे उत्कृष्ट कामगिरी करणारे रुग्णालय ठरले आहे.

‘द वीक’ या नियतकालिकाने देशभरातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये नायर  5 वे स्थान दिले आहे. तर ‘आऊटलुक’ साप्ताहिकाने देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्‍ये तिसरे स्थान देत या महाविद्यालयाचा गुणगौरव केला आहे. ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नायरला सहाव्या क्रमांकाचे स्थान बहाल करण्‍यात आले आहे. अशाप्रकारे एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील 3 वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये अग्रेसर ठरल्याचे नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्रादे यांनी दिली आहे.

नायर दंत महाविद्यालयात एकावेळी 350 पेक्षा अधिक विद्यार्थी दंत वैद्यकीय बाबींचे शिक्षण घेत असतात. यामध्ये 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि 3 वर्षीय पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी 57 प्राध्यापक महाविद्यालयात कार्यरत आहेत. या दंत वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नामवंत दंत वैद्यक म्हणून सेवा देत आहेत. 24 तास ‘इमर्जन्सी डेंन्टल क्लिनिक’ संचलित करणारे देशातील हे एकमेव दंत महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. 

सर्वेक्षणासाठी देशातील दंत महाविद्यालयांची सर्वंकष माहिती, बहुस्तरीय कामगिरी, उपलब्ध पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि त्यांची गुणवत्ता, दंत वैद्यकीय शिक्षणातील वैविध्य, संस्थेकडून आयोजित केले जाणारे उपक्रम, संशोधन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित प्रबंध आणि निबंध, शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या व्यवसायिक संधी अशा वेगवेगळ्या निकषांचा विचार करुन हे मूल्यांकन करण्यात आले.

नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाची स्थापना सन 1933 मध्ये झाली. येत्या 18 डिसेंबरला 87 व्या वर्षात पदार्पण करत असलेले हे रुग्णालय देशातील सर्वात जुने असे दुसऱ्या क्रमांकाचे दंत रुग्णालय आणि महाविद्यालय आहे. दरवर्षी सुमारे साडेतीन लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा देणा-या या रुग्णालयात 9 ‘सुपरस्पेशालिटी’ विभाग आहेत. दातांवरील उपचारांमध्ये अद्ययावत आणि सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानासह वैद्यकीय सेवा देणा-या या महाविद्यालयात संबंधित उपचारांसाठी 187 डेंन्टल चेअर असून, उपचारासाठी भरती होणा-या रुग्णांसाठी 20 खाटांचा अद्ययावत विभाग देखील आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र आणि समर्पित शस्त्रक्रियागृह असणारे हे देशातील एकमेव दंत महाविद्यालय आहे.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

National performance of Nair Dental College and Hospital 5th in country 3rd in public sector

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com