कोरोनाचा शह रोखताना आंतरराष्ट्रीय स्पर्धेची चाल; नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने होणार

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 23 एप्रिल 2020

कोरोनामुळे क्रीडा स्पर्धांना शह आणि मात होत असताना जागतिक बुद्धिबळ महासंघाने ऑनलाईन नेशन्स कप स्पर्धा घेतली आहे. पाच मेपासून ऑनलाईन होणाऱ्या या स्पर्धेत भारतासह सहा संघांचा सहभाग असेल.

मुंबई : कोरोनामुळे क्रीडा स्पर्धांना शह आणि मात होत असताना जागतिक बुद्धिबळ महासंघाने ऑनलाईन नेशन्स कप स्पर्धा घेतली आहे. पाच मेपासून ऑनलाईन होणाऱ्या या स्पर्धेत भारतासह सहा संघांचा सहभाग असेल.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या घोषणेनुसार या स्पर्धेत रशिया, अमेरिका, चीन, भारत, युरोप तसेच शेष विश्व संघाचा सहभाग असेल. एक लाख 80 हजार डॉलर बक्षिस रकमेची ही स्पर्धा चेस डॉट कॉम या संकेतस्थळाच्या सहकार्याने होणार आहे. गॅरी कास्पारोव या स्पर्धेत युरोपचे नेतृत्त्व करेल. सुरुवातीस व्लादीमीर क्रामनिक भारतीय संघाचा कर्णधार असेल असे जाहीर झाले होते, पण क्रामनिकने नकार दिल्यावर पाच वेळा जागतिक विजेतेपद जिंकलेल्या विश्वनाथन आनंदकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसननेही सहभाग नकार दिला आहे.
गोल्फमधील रायडर कपच्या धर्तीवर ही स्पर्धा होईल. 1970 मध्ये जागतिक बुद्धिबळ महासंघाने सोविएत प्रजासत्ताक (तत्कालीन) आणि शेष विश्व यांची लढत घेतली होती. आता त्याच धर्तीवर ही नेशन्स कप स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी संघात किमान एक महिला खेळाडू आवश्यक आहे. दरम्यान, कोरोनाचे आक्रमण असूनही या स्पर्धेस आठ पुरस्कर्ते लाभले आहेत.  

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

दरम्यान, या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून त्यात विश्वनाथन आनंद, विदीत गुजराती, पी हरिकृष्ण, बी अधिबन यांच्यासह कोनेरु हंपी तसेच द्रोणावली हरिका यांचा समावेश आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघ काही दिवसातच सर्व सहभागी संघांची घोषणा करणार आहे. दुहेरी साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेतील प्रत्येक लढत चार डावांची असेल. अंतिम संघात किमान एक महिला खेळाडू आवश्यक असेल. जलद प्रकाराने सर्व डाव होतील. त्यात 25 मिनिटात 40 चाली करण्याची मर्यादा असेल, त्यानंतरच्या प्रत्येक चालीसाठी दहा सेकंदाची मर्यादा असेल. दुहेरी साखळी पद्धतीने ही स्पर्धा होईल. याचाच अर्थ प्रत्येक संघ दहा सामने खेळणार आहे. अव्वल दोन संघात 10 मे रोजी अंतिम फेरी होईल. 

स्पर्धकांवर ऑनलाईन लक्षही
स्पर्धा ऑनलाईन आहे. ती पूर्णपणे खिलाडूवृत्तीने होण्याकडेही लक्ष देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय आर्बिट्रेटर या स्पर्धेवर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लक्ष ठेवतील. त्याचबरोबर स्पर्धकांना अन्य साधनांची मदत मिळू नयेसाठी लक्ष देण्यात येईल. यासाठी खेळाडू खेळत असलेला संगणक, वेबकॅम, संगणकीय स्क्रीन तसेच पूर्ण रुमवर लक्ष असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nations Cup Chess will be played online, India will be led by vishwanath Anand