मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या, वाचा कोणी केली 'ही' मागणी

पूजा विचारे
Friday, 7 August 2020

सर्वसामान्यांच्या अन्नधान्य, टीव्ही आदी घरगुती सामान या पाण्यात वाहून गेलं. याच पार्श्वभूमीवर अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी भाजपनं केली आहे. 

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत अतिवृष्टी झाली आहे. बुधवारी वेगवान वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीने मुंबईला विशेषत: दक्षिण मुंबईला चांगलेच झोडपले. या ठिकाणी अवघ्या चार तासात तब्बल ३०० मिमी पाऊस पडला.  या पावसामुळे अनेक भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे घरातील सामानांचं प्रचंड नुकसान देखील झालं.  सर्वसामान्यांच्या अन्नधान्य, टीव्ही आदी घरगुती सामान या पाण्यात वाहून गेलं. याच पार्श्वभूमीवर अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी भाजपनं केली आहे. 

अवघ्या १२ तासांत २९४ मिमी एवढा पाऊस झाला, याचा अर्थ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा,अशी मागणी भाजपने केली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. भातखळकर यांनी हे पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे. 
गेले दोन दिवस मुंबईत पडलेल्या बेसुमार पावसामुळे झोपडपट्ट्यांमध्ये घरात पाणी शिरून अन्नधान्य, पलंग,टीव्ही आदी घरगुती सामानाचे अतोनात नुकसान झाले. अवघ्या १२ तासात २९४  मिमी एवढा पाऊस झाला, याचा अर्थ ही नैसर्गिक आपत्ती आहे. मुख्यमंत्र्यानी घरटी रु.१० हजाराची मदत तातडीने जाहीर करावी, असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

दरवर्षी प्रमाणे केवळ तुंबणारे पाणी अशी परिस्थिती नसून ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्यामुळे या दोन दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून मुंबईकरांना मदत करा, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

हेही वाचाः  मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, अटक केलेल्या महिलेचं भाजप कनेक्शन

कोरोना प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणारे लोकं तसंच चाळीमधील निम्न-मध्यमवर्गीय अशा सर्वच लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागल्यामुळे मुळात त्यांच्याकडे आता कुठल्याही स्वरूपाची आर्थिक बचत राहिलेली नाही. अशा काळामुळे हे अतिवृष्टीचं संकट आल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी सर्वसामान्य माणसाची स्थिती झालेली आहे. कोरोना महामारीमध्ये राज्य सरकारने एका दमडीचीही मदत केलेली नाही. शिधावाटप दुकानावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं धान देखील मिळालेलं नाही. या सर्व बाबी लक्षात घेता राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीनंतर नजर अंदाजे सर्वेक्षण करावं, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अधिक वाचाः  निगेटीव्ह व्यक्तींचे अहवाल देण्यास BMC अधिकाऱ्यांची टाळाटाळ! हायरिस्क कुटूंबांना होतोय मनस्ताप

मागील सरकारनं अवकाळी पावसानंतर गावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश काढले होते. तसंच घरटी सर्वेक्षण न करता वस्तीश: सर्वेक्षण करण्याचे आदेश काढण्यात यावेत आणि घरटी १० हजार रुपयांची पहिली मदत ही तातडीने देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

कोरोनाच्या संपूर्ण कालखंडामध्ये उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एकही बैठक अजूनपर्यंत झालेली नाही. या एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतर तरी उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना उपनगरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे आदेश आपण द्यावेत. प्रत्यक्ष बैठकीमुळे कोरोना होण्याची त्यांना भीती वाटत असेल दृक-श्राव्य माध्यमातून किमान बैठक घ्यावी, लोकांच्या समस्या आणि लोकप्रतिनिधीचं म्हणणं ऐकणं हे सरकारचं काम आहे, ते तरी करावं, असंही अतुल भातखळकर म्हणालेत.

This is natural calamity give Rs 10,000 each Mumbaikars bjp demand

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is natural calamity give Rs 10000 each Mumbaikars bjp demand