कोल्हापुरात नवी मुंबईचा बोलबाला!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पुरामुळे कोल्हापूर शहरात झालेली दुरवस्था नवी मुंबई महापालिकेच्या ७० कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र अथक मेहनत घेऊन दूर केली. त्यांच्या या कामाची दखल घेत कोल्हापूरच्या श्रीमंत युवराज्ञी माधुरीमाराजे छत्रपती यांनी शाहू पॅलेसच्या प्रांगणात ‘कोल्हापूरच्या पाऊलखुणा’ ही कादंबरी देऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. 

नवी मुंबई : स्वच्छतेत देशात सातवा व राज्यात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई शहराने आपल्या स्वच्छतेची छाप कोल्हापूर शहरातही उमटवली. पुरामुळे कोल्हापूर शहरात झालेली दुरवस्था नवी मुंबई महापालिकेच्या ७० कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र अथक मेहनत घेऊन दूर केली. त्यांच्या या कामाची दखल घेत कोल्हापूरच्या श्रीमंत युवराज्ञी माधुरीमाराजे छत्रपती यांनी शाहू पॅलेसच्या प्रांगणात ‘कोल्हापूरच्या पाऊलखुणा’ ही कादंबरी देऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. 

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे संपूर्ण शहरात गेला आठवडाभर पाणी साठलेले होते. लाखो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली होती. चार दिवसांपूर्वीच महापुराचे पाणी ओसरल्यानंतर पाण्यासोबत आलेला गाळ वर आला. शेकडो घरे भिजल्यामुळे रस्ते, पदपथ व मुख्य चौकांसहित दिसेल तिकडे चिखलाचे साम्राज्य पसरले होते. सर्वत्र घाण व दुर्गंधीने रहिवासी हैराण झाल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. त्याच अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, दोन उपमुख्य स्वच्छता अधिकारी, ३ स्वच्छता निरीक्षक, ४ उप-स्वच्छता निरीक्षक, ६५ स्वच्छता कर्मचारी, चार बसचालक असे एकूण सुमारे ७० जणांचे पथक दोन एनएमएमटी बसमधून १३ ऑगस्टला कोल्हापूरला गेले होते. तब्बल सात दिवस कोल्हापूर शहर आणि विविध रहिवासी परिसरातील चिखल व घाणीचे साम्राज्य होते. या पथकामार्फत महापालिकेच्या स्वच्छतादूतांनी तेथे स्वच्छता केली. उत्तरेश्‍वर पेठ, दुधाळी, गवत मंडई, शुक्रवार पेठ, सीता कॉलनी, मसकुदे तलाव गल्ली, मुक्त सैनिक वसाहत, नागाळा पार्क, निगडे वसाहत, रमण मळा, पानारी मळा आदी भागात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जाऊन घाण काढली. 

महापुराने दुरवस्था झालेल्या कोल्हापूरसारख्या जुन्या व ऐतिहासिक शहराला पुन्हा एकदा नवी मुंबईच्या शिलेदारांनी झळाळी मिळवून दिली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या या कामाने भारावलेल्या उत्तरेश्‍वर पेठेतील गृहिणी सरिता सातवेकर यांना अश्रू अनावर झाले. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी समस्त पथकाचे जाहीर आभार व्यक्त करताना त्यांचा ऊर भरून आला; तर कोल्हापूरच्या  श्रीमंत युवराज्ञी माधुरीमाराजे छत्रपती यांनीही स्वच्छतादूतांचा सत्कार केला. 

कामाच्या अतिताणामुळे २५ जण आजारी
नवी मुंबईतून स्वच्छतेकरिता रवाना झालेल्या ७० जणांच्या पथकातून कामाच्या अतिताणामुळे २५ जण आजारी पडले होते. सकाळी ९ वाजल्यापासून एकदा कामाला सुरुवात झाली, की ती संध्याकाळपर्यंत सुरू असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. कोल्हापूर व पुणे महापालिकेचे काही कर्मचारी  घाणीचे काम करण्यास नकार देत होते. ते काम करण्याची हिंमत नवी मुंबईच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली. असहाय्य दुर्गंधीत अविश्रांत मेहनतीमुळे अखेर २५ जण आजारी पडले. त्यामुळे अखेर प्रशासनाने १९ ऑगस्टला सर्वांना माघारी बोलावून घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai also made an impression of its cleanliness in kolhapur