नवी मुंबई भाजप मुख्यालयाची पडझड

शरद वागदरे
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई भाजप मुख्यालयाची दुरुस्तीअभावी दयनीय अवस्था झाली असून, ते मोडकळीस आले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या गळतीमुळे मागील सहा महिन्यांपासून हे कार्यालय बंद अवस्थेत आहे.

नवी मुंबई : वाशी सेक्‍टर-१५ येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १९८५ मध्ये ग्रामपंचायत काळापासून भाजप नवी मुंबईतील पहिल्या मध्यवर्ती कार्यालयाची उभारणी करण्यात आली. नवी मुंबई शहराची जडणघडण आणि भाजपच्या राजकीय समीकरणांचे डावपेच याच कार्यालयाच्या अंगणातून खेळले गेले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयाची दुरुस्तीअभावी दयनीय अवस्था झाली असून, ते मोडकळीस आले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या गळतीमुळे मागील सहा महिन्यांपासून हे कार्यालय बंद अवस्थेत आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे नवी मुंबईतील राजकारणात मोठ्या प्रमाणावर राजकीय बदल झाले. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतले; तर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडून भाजपचे कमळ फुलविले. त्यामुळे नवी मुंबईत २००९ मध्ये उतरती कळा लागलेल्या भाजपला नवीन संजीवनी मिळाली असून, मोदींमुळे अच्छे दिन आले आहेत. मात्र, नवी मुंबईतून भाजप सूत्रे हालविणारे वाशीतील हे भाजपचे मध्यवर्ती कार्यालय सध्या अडगळीत पडले आहे. या कार्यालयाचे छत कोसळले असून, अंतर्गत भिंतींची देखील पडझड झाली आहे. प्रवेशद्वारावर गंजले आहे. ही इमारत पडकी झाल्याने या कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कार्यकर्ते येत नसल्याने हे कार्यालय बंद आहे. 

केंद्र, राज्य आणि नवी मुंबईत भाजप लोकप्रतिनिधी आहेत. मात्र, त्यांचे या कार्यालयाकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. ऐन निवडणुकीच्या काळात भाजपचे कमळ हाती घेतलेल्यांनी आपली कार्यालये सजवली. मात्र, शहरातील राजकारणात इतिहासाची साक्ष देणारे हे कार्यालय नरक यातना भोगत आहे. निवडणुकीत भाजपकडून ‘हरहर मोदी, घरघर मोदी’ असा प्रचार होत आहे. मात्र, वाशीतील या कार्यालयाला कधी अच्छे दिन येणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कार्यालय मोडकळीस आल्यामुळे जून महिन्यापासून बंद ठेवण्यात आले आहे. हे कार्यालय नव्याने बांधण्यात येणार असून, पालिकेकडे सीसीसाठी मागणी करण्यात येईल. मोडकळीस येणाऱ्या कार्यालयाची दुरुस्ती करून दोन दिवसांत हे कार्यालय सुरू करण्यात येईल.
-रामचंद्र घरत, भाजप, जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai BJP headquarters downfall