2020 जुलैपर्यंत नवी मुंबईकरांना होणार मेट्रोची सफर

सुजित गायकवाड
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ रखडलेल्या सिडकोच्या मेट्रो-1 चे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी नवी मुंबईकरांना जुलै 2020 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

नवी मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ रखडलेल्या सिडकोच्या मेट्रो-1 चे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी नवी मुंबईकरांना जुलै 2020 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

सिडकोतर्फे मेट्रो रेल्वेसाठी तयार केलेल्या पूलावरून ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यावर नोव्हेंबर ते डिसेंबरपूर्वी चाचणी घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र, रेल्वे स्थानकांच्या अर्धवट कामांमुळे ट्रॅक जोडणीचे काम पूर्ण न झाल्यामुळे या चाचण्या निश्‍चित केलेल्या मुदत ओलांडण्याची शक्‍यता सिडकोच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे विधानसभेच्या आचारसंहितेआधीच मेट्रोची चाचणी घेण्याचे राज्य सरकारचे स्वप्न, स्वप्नच राहणार आहे. अडथळा विरहीत हक्काची जमिन, पुरेसा आर्थिक पाठबळ या दोन्ही जमेच्या बाजू असूनही फक्त प्राधान्यक्रम नसल्यामुळे सिडकोने सहा वर्षांपूर्वी सुरू केलेली मेट्रो आत्तापर्यंत फक्त ट्रॅकपर्यंतच मर्यादित राहिली आहे.

बेलापूर ते पेंईधर या 11 किलो मीटरच्या मार्गावर सिडकोला 99 टक्के ट्रॅकचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. या मार्गावरील 11 रेल्वे स्थानके सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतरही अद्याप पूर्ण करण्यात सिडकोच्या अभियंत्यांना अपयश आले आहे. मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत सिडकोचे तीन व्यवस्थापकीय संचालक बदलून गेले आहेत. जुने कंत्राटदार दिवाळखोरीत निघाल्याने सिडकोने नव्या कंत्राटदारांच्या खांद्यावर रेल्वे स्थानकांच्या कामांची जबाबदारी सोपवली आहे.

मेट्रोच्या 11 स्थानकांपैकी सिडकोने 1 ते 6 मेट्रो स्थानकांच्या कामांसाठी प्रकाश कन्सोरियम यांना 127 कोटी रूपयांचे कंत्राट दिले आहे. 7 व 8 क्रमांकाचे मेट्रो स्थानकाचे काम बिल्ड राईड हा कंत्राटदारामार्फत सुरू आहे. 8 व 11 रेल्वे स्थानकाचे 43 कोटी रुपयांचे काम यूनिवास्तू यांना, तर 10 क्रमांकाचा मेट्रो स्थानक तयार करण्याचे 53 कोटी रूपयांचे काम जे. कूमार यांना देण्यात आले आहे.

सिडकोने उड्डाणपूल तयार करून त्यावर रेल्वे ट्रॅकही बसवण्यात आला आहे. मात्र, रेल्वे स्थानकांची कामे पूर्ण नसल्याने 11 रेल्वे स्थानकांदरम्यान 150 मीटर पर्यंतचे रेल्वे ट्रॅक जोडण्यात अडचणी येत आहेत. हे ट्रॅक एकमेकांना जोडले नसल्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना मेट्रोची चाचणी घेताना अडचणी येत आहेत. 

वाढता वाढता वाढे 

नवी मुंबईच्या मेट्रो मार्गाचे काम लांबणीवर पडल्यामुळे दोन हजार कोटींमध्ये होणारे काम आता तीन हजार कोटींमध्ये सिडकोतर्फे पूर्ण केले जाणार आहे. यापैकी 11 किमीचा रेल्वे उड्डाणपूल, वीज जोडण्या, सिग्नल यंत्रणा, मेट्रोचा कारशेड, आदी दोन हजार कोटींची कामे सिडकोने पूर्ण केली आहेत. मात्र, रेल्वे स्थानकांचे बांधकाम व अंतर्गत सजावटीसाठी आणखीन एक हजार कोटींचा खर्च सिडकोला अपेक्षित आहे.

पुन्हा मुहूर्त टळणार 

सिडकोतर्फे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात पहिली टेस्ट ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न होता. मात्र, विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यापर्यंत लागू होण्याची शक्‍यता असल्याने सिडकोने सप्टेंबरमध्ये चाचणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, रेल्वे स्थानके एकमेकांना न जोडल्यामुळे ही चाचणी डिसेंबर 2019 नंतर होण्याची चिन्हे आहेत.

तसेच डिसेंबर महिन्यात चाचणी झाल्यावर प्रत्येक चाचणीची माहिती भारतीय रेल्वेच्या अनुसंधान अभिकल्प विभागाला देणे बंधनकारक आहे. चाचणीचा अहवाल तपासल्यानंतर संबंधित प्राधिकरणातर्फे सिडकोला वेगाचे प्रमाणपत्र दिले जाते. तसेच त्यांच्या एका पथकाकडून पुन्हा मेट्रोची चाचणी घेतली जाते. ही चाचणी यशस्वी ठरल्यानंतर तो अहवाल रेले सुरक्षा आयोगाकडे पाठवला जातो. या आयोगाकडून जेव्हा सुरक्षा प्रमाणपत्र सिडकोला मिळेल तेव्हा प्रत्यक्षात या रेल्वेतून लोकांना प्रवास करण्यासाठी परवानगी मिळते.

या सर्व सोपस्कारासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने प्रत्यक्षात नवी मुंबईच्या मेट्रोची सफर करण्यासाठी 2020 जुलै पर्यंतचा दिवस उजडेल असा अंदाज सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Citizen will travel by metro in July 2020