मियावकी उद्यानासाठी ४२ झाडांवर कुऱ्हाड?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नवी मुंबई महापालिकेने आता चक्क एक जंगल निर्माण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घातला आहे. नेरूळच्या ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात जपानी मियावाकी तंत्रावर आधारित जंगल निर्माण करण्यासाठी पालिकेने तेथील ४२ झाडे कापण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी मुंबई : एरवी विविध विकासकामांसाठी झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने आता चक्क एक जंगल निर्माण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घातला आहे. नेरूळच्या ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात जपानी मियावाकी तंत्रावर आधारित जंगल निर्माण करण्यासाठी पालिकेने तेथील ४२ झाडे कापण्याचा निर्णय घेतला आहे. 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मियावाकी या जपानी तंत्रावर आधारित अटल आनंदवन योजनेंतर्गत राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये जंगल उभारण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेतला. विकासकामांमुळे होणारी वृक्षतोड आणि प्रदूषणावर उपाय म्हणून जपानप्रमाणेच शहरांमध्ये ‘ऑक्‍सीजन पार्क’ निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी नवी मुंबईत करण्यासाठी पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली असली तरी एका विदेशी जंगलाच्या निर्मितीसाठी त्या जागेवर अस्तित्वात असलेली ४२ झाडे तोडण्याचा अट्टाहास मात्र पर्यावरणप्रेमींना पटलेला नाही. या झाडे तोडण्यावर कोणाचा आक्षेप असल्यास, तो सात दिवसांत नोंदवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. एका ठिकाणची झाडे तोडून त्याच ठिकाणी दुसरी झाडे लावण्याकरता लाखोंचा खर्च करण्यापेक्षा, आहेत ती झाडे जगवण्याचा आणि उद्यानासाठी दुसरी पडीक जमीन शोधण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन का करत नाही, अशी विचारणा पर्यावरणप्रेमींकडून करत आहे. 

शहरातील ७८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव
शहरातील धोकादायक स्थितीमध्ये असलेली; तसेच विकासकामात अडथळा ठरणारी ७८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. यात ऐरोली सेक्‍टर- ६ येथे रस्त्यावर झुकलेली २ झाडे (उंबर व नारळाचे), नेरूळ सेक्‍टर- २० व २१ येथील पदपथावरील ३ झाडांची मुळे उघडी पडल्याने, वाशी येथील १० रेनट्री सुकलेली असल्याने व इतर ६ झाडे धोकादायक स्थितीत असल्याने, करावे येथे मैदानाच्या कामात अडथळा ठरणारी ८ झाडे; तर सानपाडा व जुईनगर येथे ५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai corporation cutting 42 trees for the Miyawaki Park?