खारघरला पाणी देण्यास नवी मुंबई महापालिकेचा नकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सिडकोच्या विनंतीवरून खारघरला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेने धुडकावला. खारघरला पाणीपुरवठा केल्यास नवी मुंबई शहराची तहान भागवताना महापालिकेसमोर अडचणी येणार असल्याचा अभिप्राय महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने दिला.

नवी मुंबई : सिडकोच्या विनंतीवरून खारघरला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेने धुडकावला. खारघरला पाणीपुरवठा केल्यास नवी मुंबई शहराची तहान भागवताना महापालिकेसमोर अडचणी येणार असल्याचा अभिप्राय महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने दिला. तसेच सध्या खारघर, कामोठे आणि कळंबोली या सिडकोच्या वसाहतींना आधीच ४० ते ४५ एमएलडी पाणी दिले जात असल्याने अधिकचे पाणी देणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे याबाबत लवकरच सिडकोच्या अधिकाऱ्यांना महापालिकेतर्फे लेखी कळवले जाणार आहे. 

खारघरला जलसंपदा विभागाच्या हेटवणे धरणातून सिडकोसाठी ३५० एमएलडी पाणीसाठा आरक्षित आहे; मात्र त्यापैकी १५० एमएलडी पाणी घेऊन खारघर नोडला दिला जातो. अतिरिक्त पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाकडून घेऊन उलवे व द्रोणागिरी येथील रहिवाशी वस्त्यांना ३५ एमएलडी पाणी दिले जाते. याव्यतिरिक्त नवीन पनवेल, कळंबोली व खांदा कॉलनी येथील भागाला ६५ एमएलडी पाणीपुरवठा पाताळगंगा नदीतून एमजेपीतर्फे घेतले जाते; तर कामोठे येथील भागाला ४० एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातील पाणीसाठा वापरला जातो.

खारघला ७५ एमएलडी पाण्याची गरज आहे; मात्र विविध संस्थांमार्फत खारघरची ६५ एमएलडीपर्यंतची तहान भागवली जाते. सध्या ज्या जलवाहिन्यांद्वारे खारघरला पाणीपुरवठा केला जातो, त्या जीर्ण झाल्याने गळतीमुळे आवश्‍यक तेवढ्या दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे खारघरकरांना उन्हाळ्याआधीच पाणीटंचाई भासू लागली आहे. सिडकोच्या मागणीनुसार मिसाळ यांनी अभियांत्रिकी विभागाला अतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अभिप्राय सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याबाबत अभियांत्रिकी विभागाने हा अभिप्राय दिला.  

अभियांत्रिकी विभाग असमर्थ
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची ४५० एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे. नवी मुंबई शहर, सिडकोच्या वसाहती, धरणाजवळच्या गावांची तहान भागवण्यासाठी धरणातून केंद्रामार्फत अधिकाधिक ४२५ ते ४३५ एमएलडी पाणी खेचून आणले जाते. हे पाणी सिडको वसाहती, गावांना दिल्यानंतर नवी मुंबई शहराच्या वाट्याला ३७० ते ३६५ एमएलडी पोहोचते, परंतु आता खारघरला अतिरिक्त पाच एमएलडी पाणी द्यायचे असेल तर शुद्धीकरण केंद्रामधून अधिक क्षमतेने पाणी घ्यावे लागेल. ते पाणी घेताना तांत्रिक बिघाड झाल्यास सध्या सुरू असलेले परिचालन अडचणीत येण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे खारघरला पाणीपुरवठा करण्यास अभियांत्रिकी विभागाने असमर्थता दर्शवली आहे. 

खारघरला अतिरिक्त पाणीपुरवठा करणे सध्या शक्‍य नाही. सिडकोच्या विनंतीवरून अभियांत्रिकी विभागाला चाचपणी करण्यास सांगितले होते; मात्र पाणी दिल्यास नवी मुंबई शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अधिकचे पाणी देता येणार नाही. लवकरच याबाबत सिडकोला कळवण्यात येईल. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai corporation refuses to provide water to Kharghar