नवी मुंबईत गणेश नाईकांचा करिष्मा कायम

गणेश नाईक
गणेश नाईक

नवी मुंबई : भाजपच्या वाटेवर असलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचा करिष्मा नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा नवी मुंबईकरांना पाहायला मिळाला आहे. नवी मुंबईतील पहिले क्रीडा संकुल असा नावलौकिक असलेल्या एनएमएसएच्या कार्यकारिणी निवडणुकीत नाईक समर्थक डॉ. दिलीप राणे पॅनेलने युतीच्या नेत्यांच्या नमो पॅनेलचा अक्षरशः धुव्वा उडवला. उपाध्यक्षांसहित इतर कार्यकारिणी सदस्य अशा एकूण १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नमो पॅनेलला एकही जागा निवडून आणता आली नाही. या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत या दोघांनाही धूळ चारल्याने नाईक पुन्हा एकदा जायंट किलर ठरले आहेत. 

तब्बल ३६ वर्षांपूर्वी वाशी येथे स्थापन झालेले ‘नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन’ हे नवी मुंबईतील सर्वात जुने क्रीडा संकुल आहे. गणेश नाईक या संकुलाचे अध्यक्ष असून, गेली अनेक वर्षे त्यांच्या अधिपत्याखाली या संकुलाचा कारभार चालवला जातो. कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे उपाध्यक्ष, खजिनदार व सरचिटणीस यांच्यासहित सदस्य अशी एकूण १२ जागांसाठी निवडणूक संपन्न झाली. परंतु या निवडणूकीत पहिल्यांदाच नाईकांच्या पॅनेलसमोर युतीच्या नवी मुंबईतील तगड्या नेत्यांनी कंबर कसल्यामुळे नाईकांना कडवे आव्हान दिले होते.

नमो अंगलट येणार?
नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या निवडणुकीत युतीच्या नेत्यांतर्फे ‘नमो’ नावाचा केलेला वापर अंगलट येण्याची शक्‍यता आहे. या नावाच्या वापराला पक्षातर्फे कोणीही अधिकृत परवानगी दिलेली नसल्याचे सूत्रांकडून समजले आहे. परवानगी न घेता नमोचा वापर केल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एका निरीक्षकाची नियुक्ती केल्याचे समजते आहे. तसेच बेकायदा पद्धतीने नाव वापरल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या पदावर गंडांतर येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच शिवसेनेतर्फेही जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे समजते. आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून या नेत्यांच्या वाशीतील विविध हॉटेलांमध्ये बैठकी सुरू होत्या. याबाबत घरत यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

निवडणुकीतील पॅनेलला देण्यात आलेल्या ‘नमो’ नावाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावातून तयार झालेल्या नमो नावाचा काहीही संबंध नाही. नमो नावाने समाजकार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही याबाबत अवगत केले आहे. त्यामुळे नाव वापरल्याने भाजपतर्फे कारवाई करण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही. 
- विठ्ठल मोरे, उमेदवार, नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com