नवी मुंबईतील गावांना मिळणार ओळख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

नवी मुंबई शहरातील गावांचे गावपण जपण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गावाबाहेर वेशीवर गावाची ओळख सांगणारी कमान बसवण्यात येणार आहे. वाशी व जुहूगावाबाहेर कमान उभारण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी (ता.१७) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली.

नवी मुंबई : स्मार्ट शहर म्हणून लौकिक असलेल्या नवी मुंबई शहरातील गावांचे गावपण जपण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गावाबाहेर वेशीवर गावाची ओळख सांगणारी कमान बसवण्यात येणार आहे. वाशी व जुहूगावाबाहेर कमान उभारण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी (ता.१७) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. महापालिकेतर्फे लोकसहभागातून वृक्षारोपण व संवर्धन व्हावे या अभिनव संकल्पनेतून ज्वेल ऑफ नवी मुंबई सेक्‍टर ३८ नजीक स्मृतिवन विकसित करण्यात येत आहे. हे क्षेत्र संरक्षित असावे यादृष्टीने त्याठिकाणी कुंपण घालणे, तसेच पदपथ तयार करणे या कामासही स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली.

विविध गावांबाहेर गाव म्हणून ओळख सांगणारे प्रवेशद्वाराचा आराखडा तयार करण्याचे काम प्रसिद्ध वास्तुविशारद सोपान प्रभू यांना देण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी प्रवेशद्वार तयार करण्यासाठी महापालिकेतर्फे २७ लाख ५४ हजार एवढा खर्च केला जाणार आहे. याखेरीज स्मृतिवन उद्यानातील संरक्षक भिंत उभारण्यासाठी ४२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामांसोबत विविध विभागांतील रस्त्यांची दुरवस्था दूर करून नागरिकांना रहदारीला व वाहतुकीला होणारा त्रास दूर करण्याच्या दृष्टीने रस्ते सुधारणा कामांच्या सादर करण्यात आलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी प्राप्त झालेली आहे. 

कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर येथील विविध प्रभागांतील रस्त्यांची सुधारणा व डांबरीकरणाच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात बेलापूर सेक्‍टर १ मार्केट ते सेक्‍टर ९ ए जंक्‍शन (ओएनजीसी कॉलनी) पर्यंतच्या रस्त्याची डांबरीकरणाने सुधारणा करणे, दिघा प्रभाग क्रमांक ४ विष्णुनगर ते विजयनगरपर्यंतचा कच्चा रस्ता चांगल्या स्वरूपात बांधणे व गटार बांधणे, विष्णुनगर येथील भूखंड क्रमांक सी १७ ते के २४ अशा रहिवाशी व औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांना फायदेशीर रस्ते व गटारे बांधणे, वाशी सेक्‍टर ३ व ४ येथील अंतर्गत रस्त्यांची डांबरीकरणाने सुधारणा करणे, प्रभाग क्रमांक ४१ कोपरखैरणे सेक्‍टर १९ सी येथील रस्त्याची डांबरीकरणाने सुधारणा करणे, वाशी सेक्‍टर १५ काही भाग व सेक्‍टर १६ आणि सेक्‍टर १६ ए येथील रस्त्यांची डांबरीकरणाने सुधारणा करणे आदी विविध विभागांतील रस्ते सुधारणा कामांना मंजुरी मिळाली.

कमान उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील
वाशी व जुहूगावाबाहेर कमान उभारण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या दोन्ही ठिकाणी प्रवेशद्वार तयार करण्यासाठी महापालिकेतर्फे २७ लाख ५४ हजार एवढा खर्च केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Navi Mumbai Identification of villages