मेट्रोच्या चाचणीसाठी नोव्हेंबरमध्ये मुहूर्त 

सुजित गायकवाड
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पाच वर्षांपेक्षा अधिक काळ रखडलेली सिडकोची नवी मुंबईतील ‘मेट्रो-१’ काही महिन्यांत ट्रॅकवर येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे ९६ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक काम झाले असून नोव्हेंबरअखेरीस तिची पहिली चाचणी होणार आहे.

नवी मुंबई - पाच वर्षांपेक्षा अधिक काळ रखडलेली सिडकोची नवी मुंबईतील ‘मेट्रो-१’ काही महिन्यांत ट्रॅकवर येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे ९६ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक काम झाले असून नोव्हेंबरअखेरीस तिची पहिली चाचणी होणार आहे. गेल्या आठवड्यात चीनमधून मेट्रोचे डबे दाखल झाले आहेत. चाचणीदरम्यान त्यांचीही क्षमता तपासण्यात येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र हे लवकरच त्यासाठी या प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. 

मेट्रो-१ हा प्रकल्प बेलापूर ते पेंधरसाठी आहे. या मार्गातील ११ स्थानकांपैकी सिडकोने १ ते ६ मेट्रो स्थानकांचे १२७ कोटी रुपयांना ‘प्रकाश कन्सोरियम’ कंपनीला काम दिले आहे. ७ आणि ८ क्रमांकाचे स्थानकाचे काम ‘बिल्ड राईड’ या कंत्राटदारामार्फत सुरू आहे. त्याला हे काम २८ कोटी रुपयांना देण्यात आले आहे. ८ आणि ११ स्थानकाचे ४३ कोटी रुपयांचे काम ‘यूनिवास्तू’ यांना;  तर १० क्रमांकाचा मेट्रो स्थानक तयार करण्याचे ५३ कोटी रुपयांचे काम ‘जे. कुमार’ यांना देण्यात आले आहे. सिडकोने नेमलेल्या नव्या कंत्राटदारांनी सुरू केलेल्या कामाला आता गती मिळाली आहे. त्यामुळे खारघर येथील उत्सव चौक, खुटूक बांधण येथील स्थानकांवर आता बाहेरील काम करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक कंत्राटदाराने त्यांचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी लोकेश चंद्र यांनी सूचना केल्या आहेत. यादरम्यान मेट्रोचे डबेदेखील आले आहेत. त्यांची पहिल्या चाचणीदरम्यान प्रत्यक्ष गुणवत्ताही तपासली जाणार आहे.  मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात चाचणी बेलापूर ते पेंधर दरम्यान होणार आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली. 

सुरुवातीपासून दिरंगाई 
मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कामापासूनच सिडको प्रशासनाकडून दिरंगाई झाली आहे. २०१२ मध्ये मेट्रोच्या प्रस्तावानुसार डिसेंबर २०१४ ही अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र निविदा प्रक्रियेपर्यंत ऑगस्ट २०१४ उजाडले. त्यानंतर मेट्रो धावण्यासाठी डिसेंबर २०१७ हा नवीन मुहूर्त देण्यात आला होता. तो कंत्राटदारांच्या न्यायालयीन वादामुळे टळला. आता ऑक्‍टोबर २०१९ हा अखेरचा मुहूर्त समजण्यात येतो.

कंत्राटदारांमुळे फटका
बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गावरील ११ किलोमीटर अंतरावरील उन्नत मार्ग, पेंधर येथील कारशेड आणि रेल्वेस्थानके तयार करण्याचे काम सिडकोमार्फत देण्यात आले होते. त्यापैकी सिडकोला कारशेड आणि उन्नत मार्ग वेळेत तयार करण्यात यश आले; मात्र रेल्वेस्थानके तयार करण्यात सिडकोचे कंत्राटदारांचे काम मागे पडल्याने गेल्या सहा वर्षांनंतरही पहिला टप्पा पूर्ण होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे अखेर सिडकोने सॅजोन्श, सुप्रिम आणि महावीर या तिघांच्या भागीदारीतील कंपनीची हकालपट्टी करून त्यांच्या अर्धवट कामांसाठी दुसरे कंत्राटदार नेमले आहेत.

Web Title: Navi mumbai metro-1 issue