आयुक्तांची धाड पडताच, ...या कंपनीतील कामगार पळाले!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

‘कोरोना’च्या धर्तीवर कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याचे आदेश बहुतांश कंपन्यांना असताना या आदेशाची तपासणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ऐरोलीतील ‘माइंड स्पेस’ कंपनीवर धाड टाकली.

नवी मुंबई : ‘कोरोना’च्या धर्तीवर कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याचे आदेश बहुतांश कंपन्यांना असताना या आदेशाची तपासणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ऐरोलीतील ‘माइंड स्पेस’ कंपनीवर धाड टाकली. मिसाळ यांनी अचानक कंपनीला भेट देऊन कार्यरत असणाऱ्या कामगारांचा आढावा घेतला. याप्रसंगी गोंधळलेल्या व्यवस्थापनाने अखेर 
सर्व कामगारांना वेळेआधीच घरी जाण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा - त्याने धावत्या लोकलमधून वृद्धास ढकललं! वाचा नेमकं काय झालं...

कंपन्यांमध्ये कामगारांचा एकमेकांशी संपर्क होत असल्याने ५० टक्के कामगारांना घरातूनच काम करण्याच्या सूचना द्याव्यात असे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशानुसार एमआयडीसीतील काही आयटी कंपन्या आणि कॉर्पोरेट पार्क यांना महापालिकेने कामगारांना घरातूनच काम करण्याच्या सूचना देण्याबाबत विनंती केली होती. ऐरोलीतील माइंड स्पेस कंपनीतील एक कर्मचारी कोरोना विषाणूबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे महापालिकेचे माइंड स्पेसवर विशेष लक्ष होते. कर्मचारी बाधित असल्याचे समजल्यावर माइंड स्पेसने तो कर्मचारी कार्यरत असणारी ११ क्रमांकाची इमारतही बंद केली होती, परंतु ५० टक्के कर्मचारी कार्यरत आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी अण्णासाहेब मिसाळ यांनी संध्याकाळच्या सुमारास माइंड स्पेस कंपनीला भेट दिली. या भेटीदरम्यान जास्त कामगार कार्यरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाहणीदरम्यान ५० टक्केपेक्षा जास्त कामगार आढळून आल्यामुळे अधिकच्या कामगारांना घरी सोडण्याच्या सूचना मिसाळ यांनी कंपनीला दिल्या.

हेही वाचा - ...'हे' घेऊन बाहेर फिरू नका; पोलिस करणार कारवाई!

माइंड स्पेस कंपनीत किती कर्मचारी कार्यरत आहेत, तसेच किती कर्मचारी घरूनच काम करत आहेत हे पाहण्यासाठी भेट दिली होती, परंतु त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्याच जास्त असल्यामुळे त्यांना काही कामगार सोडून देण्याच्या सूचना केल्या.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Commissioners Meet 'Mind Space' Company