48 तासांत गाळ न उचलणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नवी मुंबई -  गटारांच्या मान्सूनपूर्व स्वच्छतेसाठी उपसलेला गाळ सुकल्यानंतरही न उचलणाऱ्या तब्बल 32 कंत्राटदारांवर पालिकेने कारवाई केली आहे. या कंत्राटदारांना दोन लाख पाच हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. गटारांच्या स्वच्छतेसाठी पालिकेने 91 कंत्राटदारांना नेमले आहे. तसेच गटारांतून काढण्यात येणारी माती, गाळ अथवा चिखल 48 तासांच्या आत उचलून तुर्भे येथील क्षेपणभूमीवर टाकण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. 

मान्सूनपूर्व नाले व गटारांच्या साफ-सफाईला शहरात सध्या वेग आला आहे. पावसाळी गटारे व नाल्यांच्या स्वच्छतेवर प्रशासनाकडून लक्ष केंद्रित केले जात आहे. शहरातील पावसाळी गटारे स्वच्छ करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्याकडून नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. पावसाळी गटारातून सफाई करताना निघणारा ओला कचरा, माती व गाळ सुकल्यानंतर तो 48 तासांच्या आत उचलणे अपेक्षित आहे. सुकलेला गाळ ट्रकने उचलून तुर्भे येथील क्षेपणभूमीमध्ये नेऊन गोळा करण्याच्या सूचना कंत्राटदारांसहीत स्वच्छता अधिकारी व निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत; मात्र तरीसुद्धा काही कंत्राटदारांकडून गाळ वाहून नेण्यासाठी ट्रक व डंपर ही वाहने उपलब्ध होत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. यामुळे शहरात फूटपाथवर तसेच रस्त्याच्या कडेला गटाराच्या शेजारी उपसलेल्या गाळाचे ढिगारे साठले आहेत. यातून फुटपाथवरून चालताना नागरिकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. तसेच अधिक दिवस हा गाळ न उचलल्यास स्वच्छ केलेल्या गटारात पुन्हा माती गोळा होण्याचा प्रकार घडू शकतो. त्यामुळे 48 तासांमध्ये गाळ न उचलल्यामुळे अटी व नियमांचा भंग केल्याप्रकरणी 91 पैकी कारणे सांगणाऱ्या 32 कंत्राटदारांकडून दोन लाख पाच हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. येत्या 25 मेपर्यंत पावसाळापूर्व सफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना रामास्वामी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

Web Title: Navi mumbai municipal corporation action on contractors who do not silt in 48 hours