नवी मुंबई महापालिका सेंट्रल लायब्ररी उभारणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शहरातील नागरिकांमध्ये वाचनाची आवड वाढावी, रुजावी याकरिता महापालिकेतर्फे अद्ययावत सेंट्रल लायब्ररी (वाचनालय) उभारण्यात येणार आहे. सानपाडा येथे सुमारे दोन हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर ही लायब्ररी उभारण्याचा पालिकेचा मानस आहे.

नवी मुंबई : शहरातील नागरिकांमध्ये वाचनाची आवड वाढावी, रुजावी याकरिता महापालिकेतर्फे अद्ययावत सेंट्रल लायब्ररी (वाचनालय) उभारण्यात येणार आहे. सानपाडा येथे सुमारे दोन हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर ही लायब्ररी उभारण्याचा पालिकेचा मानस आहे.

नवी मुंबई शहर बहुभाषीय लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, त्यापैकी मराठी नागरिकांचा वास्तव्याचा टक्का इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईत सर्वाधिक आहे. या नागरिकांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल, अशा सुविधा देण्याचा प्रयत्न महापालिकेमार्फत केला जाणार आहे. सिडकोकडून सानपाडा सेक्‍टर- ११ भूखंड क्रमांक १ येथे देण्यात आलेल्या १ हजार ७७० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर ही लायब्ररी उभारली जाणार आहे. ही लायब्ररी उभारण्याआधी राज्यभरातील विविध ग्रंथालयांच्या अंतर्गत सजावट, साहित्य संग्रहांच्या ठेवींचा अभ्यास करण्याचे काम पालिकेच्या समाज विभागातर्फे सुरू केले आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या सूचनेनंतर समाज विभागाच्या उपायुक्त क्रांती पाटील यांच्या पथकाने नुकताच राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, एशियाटीक लायब्ररी व राज्य ग्रंथालय संचालनालय यांना भेट देऊन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या साहित्य संग्रहाची पाहणी केली; मात्र सर्वसमावेशक लायब्ररी तयार करायची असल्यामुळे पालिकेचे एक पथक लवकरच गोवा येथील कृष्णादास शामा मध्यवर्ती ग्रंथालयाला देखील भेट देणार आहे. 

काय असेल या लायब्ररीत?
पालिकेतर्फे तयार करण्यात येणाऱ्या या लायब्ररीत डिजिटल लायब्ररी, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून बालविभाग, स्वतंत्र संशोधन विभाग, ललित साहित्य संग्रह, नवोदित लेखकांसाठी खास सदर, जगभरातील साहित्य संपदा, विविध भाषांतील साहित्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आध्यात्मिक साहित्य व ग्रंथ, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था, काही व्याख्यानमाला आयोजित करून बौद्धिक विचारांचे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

सिडकोकडून महापालिकेला नुकताच वर्ग करण्यात आलेल्या सानपाड्यातील भूखंडावर सेंट्रल लायब्ररी उभारण्याचा प्रयत्न आहे. शहराच्या सौंदर्यात भर पडेल, अशी इमारत उभारण्याच्या अनुषंगाने अभियांत्रिकी विभागाला अभ्यास करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सध्या प्रथामिक चर्चा सुरू आहे. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai Municipal corporation to be set up Central Library