नवी मुंबई महापालिकेला पान टपऱ्यांवरील कारवाईचा विसर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

शहरात अनेक हॉटेल व रेस्टॉरेन्टबाहेर पानटपऱ्या सुरू असल्याचे दृश्‍य नजरसे पडत आहे. काही ठिकाणी तर खुले बार टाकले आहेत.  

नवी मुंबई : शहरात हॉटेल, रेस्टॉरेन्ट आणि विविध मोक्‍यावरच्या चौका-चौकांत थाटलेल्या पानटपरी चालकांवर अन्न व औषध प्रशासनातर्फे दाखवल्या जात असलेल्या कृपादृष्टीमुळे पानटपरी चालकांचे चांगलेच फावले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परिपत्रकामुळे काही दिवसांपूर्वीच पालिकेतर्फे विभाग अधिकाऱ्यांनी टपऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र, देखाव्यापुरती कारवाई संपल्यानंतर अनेक हॉटेल व रेस्टॉरेन्टबाहेर पानटपऱ्या सुरू असल्याचे दृश्‍य नजरसे पडत आहे. काही ठिकाणी तर खुले बारदेखील टाकले आहेत.  

अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासनातर्फे जानेवारी २०१८ ला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम १८ नुसार मानवी जीवनाच्या आरोग्यासाठी व ग्राहकांच्या हितांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक ती उपाययोजना करण्याची केंद्र सरकार, राज्य सरकार व अन्न सुरक्षा प्राधिकरण यांची जबाबदारी असणारे एक परिपत्रक काढण्यात आले होते. शहरातील छोट्या पान दुकानात तंबाखूसोबत टॉफीज, चॉकलेट्‌स, चिप्स, बिस्कीट, शीतपेय आदी पदार्थांची विक्री केली जाते. बहुतांश पानटपऱ्या या हॉटेल्स व रेस्टॉरेन्टच्या बाहेरील जागेवर थाटलेल्या आहेत. 

हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या कुटुंबांमध्ये अनेकदा लहान मुले असतात. ही लहान मुले त्या पानटपऱ्यांवर इतर पदार्थ आणायला जाताना तंबाखूजन्य वस्तू घेण्याची शक्‍यता अन्न व औषध प्रशासनातर्फे वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अशा पानटपऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार घणसोली, ऐरोली व वाशीमध्ये काही पानटपऱ्यांवर विभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केल्या होत्या; परंतु सीबीडी-बेलापूर, नेरूळ, सीवूडस्‌, सानपाडा व जुईनगर आदी भागांत अद्यापही राजरोसपणे हॉटेलांबाहेर पानटपऱ्यांनी थाटलेला संसार सुरू आहे. या टपऱ्या सुरू असल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परिपत्रकालाच हरताळ फासला जात आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोकळ्या जागेत बारचे पेव 
हॉटेल्स व रेस्टॉरेन्ट यांना परवाना देताना बाहेरील जागा मोकळ्या ठेवण्याची तरतूद पालिकेने आखली आहे; परंतु काही हॉटेलचालक स्वतःच भाडे घेऊन पानटपऱ्यांना परवानगी देत आहेत. त्यामुळे महापालिकेला परवाना माध्यमातून मिळणाऱ्या महसुलावर गदा येत आहे. सीबीडी, ऐरोली, घणसोली व कोपरखैरणे भागांत काही हॉटेलचालकांनी बाहेरील मोकळ्या जागेत टेबल टाकून उघड्यावर मद्यपींना बसून मद्यप्राशन केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Corporation Forget about the action on open space shops