esakal | नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतनासाठी पायपीट
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतनासाठी पायपीट

सेवापुस्तिकेच्या अपूर्ण नोंदी, तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांकडून पडताळणी आदी महत्त्वाच्या बाबींची पूर्तता न केल्यामुळे वर्षभरात निवृत्त झालेल्या १८ पैकी फक्त २ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचा लाभ मिळू शकला आहे. 

नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतनासाठी पायपीट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : आयुष्यभर राबून जनता आणि प्रशासनाची सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतर वर्षभरात निवृत्तिवेतन न मिळाल्यामुळे महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगार हतबल झाले आहेत. सेवापुस्तिकेच्या अपूर्ण नोंदी, तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांकडून पडताळणी आदी महत्त्वाच्या बाबींची पूर्तता न केल्यामुळे वर्षभरात निवृत्त झालेल्या १८ पैकी फक्त २ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचा लाभ मिळू शकला आहे. कर्मचारी कार्यरत असताना तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे प्रशासन विभागाकडून सेवा पुस्तिकेच्या नोंदीबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. 

महापालिकेच्या कामगारांना त्यांना नेमून दिलेल्या दैनंदिन कामासोबतच सेवा पुस्तिकेवरील नोंदी करायच्या असतात. या नोंदी गोपनीय असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या विभाग अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करून निश्‍चित केली जाते; मात्र वर्षभरात कामाच्या रहाटगाड्यामुळे कामगारांकडून या नोंदींकडे लक्ष दिले जात नाही. तसेच विभागामार्फतही त्यांना या सेवा पुस्तिकांच्या नोंदींची आठवण करून दिली जात नाही. निवृत्तीअखेरीस या बाबी लक्षात आल्यावर संबंधित कामगारांची धावपळ होत आहे. परंतु तोपर्यंत संबंधित विभाग अधिकाऱ्याची बदली झाली असेल तर प्रशासनाने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाकडून निर्णयाचा अभाव असल्यामुळे अडलेल्या कर्मचाऱ्याला आपल्या सेवा पुस्तिकेवरील नोंदी पडताळणीसाठी संबंधित बदली झालेल्या अधिकाऱ्याला शोधून त्याची स्वाक्षरी आणावी लागत आहे. अलीकडेच एका कर्मचाऱ्याला नागपूर गाठावे लागले होते. सेवानिवृत्तीच्याच दिवशी कामगारांचा त्यांचा सर्व हिशेब मिळावा. याकरिता तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी हे आग्रही होते; परंतु त्यांच्या बदलीनंतर आता हे काम संथगतीने सुरू आहे. 

कर्मचाऱ्यांची पदोन्नती, असुविधा, समस्या, सेवानिवृत्तीनंतरचा हिशेब व कर्मचारी-अधिकारी यांचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून संबंधितांना पूर्ण वेळ त्याच कामाची जबाबदारी सोपवावी. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल.
- रवींद्र सावंत, इंटक जिल्हाध्यक्ष.

महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या एकाही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना अद्याप निवृत्तीनंतरचे लाभ मिळाले नसतील तर त्याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात येतील.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

loading image
go to top