ईदसाठी बकरे सांभाळण्यास नवी मुंबई महापालिकेची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

बकरी ईदनिमित्ताने शहरातील मुस्लिम समाजाला बकरे सांभाळण्याकरिता महापालिकेतर्फे विशेष परवानगी देण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय विभागातर्फे महापे व सीवूड्‌स येथील एल ॲण्ड टी उड्डाणपुलाखालची मोकळी जागा बकरे बांधण्यासाठी निश्‍चित करण्यात आली आहे.

मुंबई : बकरी ईदनिमित्ताने शहरातील मुस्लिम समाजाला बकरे सांभाळण्याकरिता महापालिकेतर्फे विशेष परवानगी देण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय विभागातर्फे महापे व सीवूड्‌स येथील एल ॲण्ड टी उड्डाणपुलाखालची मोकळी जागा बकरे बांधण्यासाठी निश्‍चित करण्यात आली आहे. या ठिकाणी स्वच्छता, बकऱ्यांचे आरोग्य तपासणी आदी बाबी तपासल्यानंतर परवाने देण्यात येणार आहेत. त्यामुळे ईदच्या दिवशी नागरिकांना चांगल्या दर्जाचे मांस उपलब्ध होणार आहे.

बकरी ईद साजरी करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून तब्बल ३ ते ४ हजार बकरे मागवले जातात. या काळात बकऱ्यांची मागणी जास्त असल्याने खरेदीचे प्रमाणही वाढलेले असते. त्यामुळे राज्यभरातील बकऱ्यांसहीत परराज्यांतूनही बकऱ्यांचा माल नवी मुंबईत येत असतो. बकऱ्यांच्या विष्ठेमुळे दुर्गंधीयुक्त वातावरण होऊन अस्वच्छता पसरलेली असते. तसेच या वातावरणात विकल्या जाणाऱ्या बकऱ्यांच्या मांसाचा दर्जाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतो. परंतु या वर्षी पशु वैद्यकीय विभागामार्फत बकरी ईद काळात बकरे सांभाळण्यासाठी खास परवाना दिला जाणार आहे. बकरे उभे करण्यासाठी महापे व एल ॲण्ड टी उड्डाणपुलाखालच्या जागेचा वापर केला जाणार आहे. ही जागा पूर्ण स्वच्छ करून दुर्गंधी येणार नाही, याची खबरदारी महापालिका घेणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai municipal permission to handle goats for Eid