नवी मुंबई महापालिकेच्या शिट्टीचा आवाज बंद!

नवी मुंबई महापालिकेच्या शिट्टीचा आवाज बंद!
नवी मुंबई महापालिकेच्या शिट्टीचा आवाज बंद!

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने ‘स्वच्छ भारत अभियान २०१९’ मध्ये देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी कंबर कसली होती. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता; मात्र स्वच्छ भारत अभियान झाल्यानंतर उघड्यावर हागणदारी करणाऱ्यांवरील कारवाई थंडावली आहे. पहाटेच्या वेळी हागणदारीमुक्तीसाठी पालिकेच्या ‘गुड मॉर्निग’ पथकांची वाजणारी शिट्टी बंद झाली आहे. त्यामुळे झोपडपट्टीमधील रहिवासी डोंगरभागासह रेल्वे ट्रॅकवर पुन्हा उघड्यावर शौचास बसत असल्याने शहर अस्वच्छ होत आहे. त्यामुळे शहर हागणदारीमुक्त करण्याच्या पालिकेच्या संकल्पनेचे तीनतेरा वाजले आहेत.

माजी पालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये पालिकेला देशात प्रथम क्रमांक आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यासाठी पालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना पहाटे पाच वाजल्यापासून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कामाला जुंपले होते. स्वत: आयुक्तदेखील पहाटेच्या वेळी शहरामध्ये फेरफटका मारून शहर स्वच्छ आहे की नाही, याची खातरजमा करत होते. स्वच्छ भारत अभियानामध्ये शहरात असणाऱ्या शौचालयांची देखील पाहणी करून शौचालयामध्ये साफसफाई ठेवण्यात येत होती. मात्र शौचालयांचे नळ तोडणे, विजेचे दिवे चोरणे, कमोड तोडणे असे प्रकार झोपडपट्टीमधील समाजकंटकांकडून करण्यात येत होते. यामुळे पालिका अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. त्यातच पालिका अधिकाऱ्यांच्या पहाटेच्या वेळी एमआयडीसीच्या भूखंडावर अनधिकृतपणे डोंगराच्या कुशीत राहत असणारे विष्णुनगर, इलठणपाडा, यादवनगर, तुर्भे, रबाळे येथील रहिवासी उघड्यावर शौचालयास जात होते. या उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या झोपडपट्ट्यातील रहिवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांकडून १२०० रुपये; तर लघवी करणाऱ्यांकडून २५० रुपये दंड आकरण्यात येत होता. त्यामुळे उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. मात्र, स्वच्छ भारत अभियान झाल्यानंतर पुन्हा उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाचे केंद्रीय पथक येणार असल्याने पालिकेचे गुड मॉर्निंग पथक शहरभर फिरत होते; मात्र त्यानंतर लागलेल्या निवडणुका व दिवाळीनंतर हागणदारी मुक्तीकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी गुड मॉर्निंग पथकाने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पालिकेने झोपडपट्टीमध्ये उत्तम अशा प्रकारचे शौचालय बांधून दिले आहे. पालिका कर्मचारी स्वच्छ सर्वेक्षणाच्या वेळी पहाटे फिरत असताना झोपडपट्टी भागातील डोंगर भागामध्ये उघड्यावर शौचासाठी जाणारे घाबरत होते. मात्र पालिकेचे कर्मचारी पहाटेच्या वेळी फिरणे बंद झाल्यापासून झोपडपट्टीतील रहिवाशांनी उघड्यावर शौचास बसण्यास सुरुवात केली आहे.
- नितीन माने, नागरिक.

हागणदारीमुक्तीसाठी पालिकेचे पथक सकाळच्या वेळी बंद झालेले असल्यास, त्यांना स्वच्छ भारतच्या अनुषंगाने पुन्हा कार्यरत होण्याच्या सूचना देण्यात येतील.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com