नवी मुंबई महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार

नवी मुंबई महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार
नवी मुंबई महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातून देशाला व राज्याला अधिकारी मिळावेत, या उद्देशाने महापालिकेकडून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. बुधवारी (ता.२०) झालेल्या महासभेत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याच्या व त्यासाठी ४० लाख रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे मोफत प्रशिक्षण शहरातील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. 

या केंद्रास मंजुरी मिळाल्याने पालिकेने शिक्षणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. बेलापूर येथील कै. गौरव म्हात्रे कला केंद्रात ही प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात येणार असून, लवकरच विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यातून ४० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. प्रवेशासाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी संपल्यावर मूळ अनामत रकमेची पावती दाखवल्यावर ही अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे. जर नवी मुंबईतून ४० विद्यार्थी आले नाहीत तरच इतर भागांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी पदवी परीक्षेत अनारक्षित उमेदवारांना ५५ टक्के, तर आरक्षित उमेदवारांना ५० टक्के गुण मिळालेले असणे गरजेचे आहे. 

आजतागायत स्पर्धा परीक्षांचा देशातील व राज्यातील निकाल पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी अग्रेसर असल्याचे पाहायला मिळते. शहरी भागातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का कमी असतो. त्यामुळे येत्या काळात या स्पर्धा परीक्षा केंद्रातून देशाला व राज्याला नवी मुंबईतून उत्तीर्ण झालेले अधिकारी मिळण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास नवी मुंबई शहराचे नाव देश व राज्य पातळीवर उंचावण्यास मदत होणार आहे.

सर्वोत्कृष्ट पुस्तके, तज्ज्ञ व्याख्याते उपलब्ध होणार
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्‍यक असलेली सर्वोत्कृष्ट पुस्तके या केंद्राद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी तज्ज्ञ व्याख्याते नेमण्यात येणार आहेत. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत तसेच महत्त्वाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com