नवी मुंबईत फेरीवाल्यांवरील कारवाई थंडावली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर सेक्‍टर ४, सीवूड्‌स सेक्‍टर ४८, नेरूळ, वाशी सेक्‍टर ९, घणसोली, कोपरखैरणे व ऐरोली येथे फेरीवाल्यांकडून रस्ते व पदपथांवर कब्जा करण्यास सुरुवात झाली आहे. फेरीवाल्यांनी भररस्त्यातच संसार थाटल्याने संध्याकाळच्या वेळेस नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या बदलीनंतर शहरात पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः संध्याकाळच्या सुमारास सीबीडी-बेलापूर सेक्‍टर ४, सीवूड्‌स सेक्‍टर ४८, नेरूळ, वाशी सेक्‍टर ९, घणसोली, कोपरखैरणे व ऐरोली येथे फेरीवाल्यांकडून रस्ते व पदपथांवर कब्जा करण्यास सुरुवात झाली आहे. फेरीवाल्यांनी भररस्त्यातच संसार थाटल्याने संध्याकाळच्या वेळेस नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. 

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील बेशिस्त फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी धडक कारवाई करून कंबरडे मोडले होते. त्यानंतर आलेले रामास्वामी यांनीही फेरीवाल्यांना पदपथ व रस्त्यांवर थारा दिला नाही; मात्र त्यांच्या बदलीनंतर शहरात पुन्हा फेरीवाल्यांकडून रस्ते व पदपथ काबिज केले जात आहेत. शहरातील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करून अधिकृत फेरीवाल्यांना कायदेशीर जागा देण्याचे काम महापालिकेत अतिशय संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी विभाग कार्यालयांमार्फत खिसे गरम करून फेरीवाल्यांना बसू दिले जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईला हप्तेखोरीचे ग्रहण लागल्यामुळे बेलापूरपासून ते दिघ्यापर्यंतच्या भागात फेरीवाल्यांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढीस लागले आहेत. 

शहरातील फेरीवाल्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी, स्वच्छता आणि प्लास्टिकच्या वापरामुळे सरकारी नियमांची सर्रासपणे मोडतोड केली जात आहे. सुटसुटीत आणि सुनियोजित रस्त्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबई शहरातील रस्ते संध्याकाळी फेरीवाल्यांना आंदण दिल्यासारखे भासते आहे. महापालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी रस्ते, पदपथ, मोकळी मैदाने अशा महत्त्वाच्या जागा फेरीवाल्यांनी व्यापलेल्या आहेत. 

फेरीवाला धोरण अधांतरीच
फेरीवाल्यांचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक नोडमध्ये बहुमजली मार्केट इमारती उभारल्या आहेत. मार्केटमधील ओटले फेरीवाल्यांना वाटले आहेत; मात्र फेरीवाल्यांच्या संख्येपुढे पालिकेचे गाळे तुटपुंजे ठरत असल्याने फेरीवाला धोरण फोल ठरले आहे. दुपारच्या दरम्यान ओस असलेले शहरातील रस्ते संध्याकाळच्या सुमारास फेरीवाल्यांनी गजबजून गेल्यामुळे रस्त्यांना यात्रेचे स्वरूप आलेले असते. 

सर्वच नोडला फेरीवाल्यांचे ग्रहण
महापालिका हद्दीत असा एकही नोड शिल्लक राहत नाही ज्या ठिकाणी रस्त्यावर फेरीवाले नसतात. बेलापूर, सेक्‍टर ४ मध्ये तर फेरीवाल्यांकडून रस्ताच अडवून धरला जातो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादी रुग्णवाहिका अथवा अग्निशमन दलाचे वाहन जाणे मुश्‍किल होऊन जाते, अशी तक्रार अनेकदा नगरसेवकांकडून पालिकेत मांडण्यात आली. नेरूळ रेल्वेस्थानकासमोरील रस्ते व पदपथ हे फेरीवाल्यांकडून व्यापले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी अतिक्रमण पथकाचे अधिकारी दुसऱ्यांवर कारवाई करतात, अशी व्यथा रेल्वे प्रवाशांकडून मांडण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Navi Mumbai On the peddlers Action stopped