प्लास्टिकमुक्तीची क्रांती! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

नवी मुंबई - नवी मुंबई शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी "सकाळ' व महापालिकेने सुरू केलेला प्लास्टिकविरोधी जागर रविवारी सकाळपासून शहराच्या कानाकोपऱ्यात होऊन प्लास्टिकमुक्तीच्या क्रांतीला सुरुवात झाली. प्रसिद्ध पार्श्‍वगायक शंकर महादेवन व अभिनेत्री जुही चावला यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबईतील ऍप्मी थिएटरमध्ये अभियानाला प्रारंभ झाला. पर्यावरणाला वाचविण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत अवघ्या काही तासांमध्ये तब्बल 25 हजार किलो प्लास्टिक जमा करण्याचा विक्रम केला. 

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईकरांच्या चर्चेत असलेल्या आणि "सकाळ' व महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक विरोधी मोहिमेला सकाळी बोचऱ्या थंडीत सुरुवात झाली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, "सकाळ' मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक राहुल गडपाले यांच्यासह मराठी हास्य कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला प्रारंभ झाला. प्लास्टिकमुळे मानवाच्या आरोग्यासह पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याने प्लास्टिकऐवजी पर्यायी वस्तू वापरण्याचे आवाहन अभिनेत्री जुही चावला यांनी केले. नवी मुंबईला तुकाराम मुंढेंच्या माध्यमातून एक जिगरबाज अधिकारी लाभला असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे नवी मुंबई प्लास्टिकमुक्त होईल, असा विश्‍वास जुही चावला यांनी व्यक्त केला. शंकर महादेवन याने "लक्ष्य' सिनेमातील गाणे गात उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर महापालिकेच्या अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी महापालिकेने उद्याने, मैदानांसह सार्वजनिक जागांवर प्लास्टिक वस्तूंना मनाई केली आहे, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. नवी मुंबई शहराला स्वच्छ भारत सर्वेक्षणात सकारात्मक सहकार्य करण्याचे आवाहनही मुंढेंनी केले. 

बच्चे कंपनी व विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्लास्टिकचा वापर न करण्यासाठी अभिनेत्री राजर्षी देशपांडे हिने व्यायामाच्या माध्यमातून संदेश दिला. 

शहरातून प्लास्टिकच्या वस्तू हद्दपार व्हाव्यात, यासाठी मुंढेंनी उपस्थितांना शपथ दिली; तसेच प्लास्टिकमुक्त नवी मुंबई अभियानाच्या निमित्ताने महापालिकेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वाशीत महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या ई-टॉयलेटला जुही चावला, शंकर महादेवन आणि मुंढे यांनी भेट दिली. त्यानंतर वाशी रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर व इनऑर्बिट मॉलसमोरील परिसरात तुकाराम मुंढे यांच्यासह जुही चावला, शंकर महादेवन, अभिनेते अरुण कदम, अरुण नलावडे, सुयश टिळक यांनी प्लास्टिक जमा केले. 

प्लास्टिकमुक्त शहराचा कोपरखैरणेत गजर 
कोपरखैरणे -  "से नो टू प्लास्टिक, सेव्ह नेचर, प्लास्टिकमुक्त शहर करू' अशी भित्तिपत्रके घेत कोपरखैरणे परिसरात आज शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती केली. या रॅलीमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांबरोबरच सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला. त्यानंतर सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिकांनी कानाकोपऱ्यातील प्लास्टिक कचरा जमा केला. 

कोपरखैरणे परिसरात आज सकाळपासून प्लास्टिकमुक्तीचा जागर पाहावयास मिळाला. रॅलीनंतर कानाकोपऱ्यातील प्लास्टिक गोणींमध्ये जमा करण्यात आले, तर दुपारच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा असलेल्या खैरणे येथील नाल्यात स्वतः आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण उतरले. त्यांनी तेथील प्लास्टिक कचरा बाहेर काढला. 

या भागातील 15 शाळांमधील तीन हजार 600 हून अधिक विद्यार्थी, दीडशे शिक्षक उपक्रमात सहभागी झाले. त्यांच्याबरोबरच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्यही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. 

"सकाळ' व महापालिकेची मोहीम कौतुकास्पद आहे. त्यात सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग आनंददायी आहे. मात्र, अशी मोहीम आजच न करता हा आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे. 
- सुधीर थळे, मुख्याध्यापक, रा. फ. नाईक महाविद्यालय. 

प्लास्टिक कचरा उचलताना सुरुवातीला घाण वाटली. त्यापासून होणारी हानी समजल्यानंतर हा कचरा उचलण्याची आपलीच जबाबदारी असल्याची भावना झाली. आजपासून मी प्लास्टिकचा वापर करणार नाही. 
- वैशाली कामत, विद्यार्थिनी. 

यापुढे "नो प्लास्टिक' 

नवी मुंबई - प्लास्टिकमुक्त मोहिमेचे औचित्य साधत वाशीमध्ये हजारो विद्यार्थी, नागरिकांबरोबरच सामाजिक संस्थांकडून यापुढे "नो प्लास्टिक'चा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी काढलेली रॅली लक्षवेधी ठरली होती. या रॅलीनंतर शहरातून तब्बल 362 गोणी प्लास्टिक जमा करण्यात आले. 

वाशीतील अंकरवाला शाळेपासून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. त्यात अंकरवाला स्कूल, सेंट मेरी आणि राजीव गांधी साईनाथ हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीबरोबरच शेकडो नागरिक, महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच स्वयंसेवी संस्थांच्या 423 प्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे प्लास्टिक जमा करण्याचे काम सुरू केले. त्यातून वाशीतील 11 प्रभागांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कानाकोपऱ्यातील प्लास्टिक शोधण्यास सुरुवात केली. एमजीएम कॉम्प्लेक्‍स व मिनी सीशोरचा परिसर प्लास्टिकमुक्त झाला. प्रत्येक विभागातून सुमारे तीन ते चार गोण्या प्लास्टिक जमा करण्यात आले. या मोहिमेच्या सांगतेवेळी उपस्थितांनी यापुढे "नो प्लास्टिक'चा संदेश दिला. 

Web Title: navi mumbai plastic free