Navi Mumbai: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navi Mumbai

Navi Mumbai: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार

नवी मुंबई, ता. १ : ५०० चौरस फुटांच्या आकाराची घरे असणाऱ्या नवी मुंबईकरांना राज्य सरकारतर्फे मोठा दिलासा मिळाला आहे. ५०० चौरस फुटांच्या आकाराच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, एमआयडीसी, मेरी टाईम बोर्ड आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सर्वात प्रथम ठराव करून पालिका हद्दीतील ५०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या निवासी घरांना मालमत्ता कर माफ केला आहे.

ठराव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवून दिला आहे; मात्र त्यावर अद्याप सरकारने निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे या प्रस्तावाकडे सर्व नवी मुंबईकरांच्या नजरा खिळल्या होत्या.

त्याचबरोबर ५०१ ते ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना ६० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महासभेने ठराव केल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला होता.

त्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठकीत केली. या मागणीवर निर्णय देत अत्यावश्यक कर आकारणी करून ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना ठाण्याच्या धरतीवर करमाफी देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय

ऐरोली-काटई मार्गावर नवी मुंबईकरांसाठी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका

सिडकोच्या सुविधा भूखंडांच्या हस्तांतरणाबाबत सकारात्मकता

५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर होणार माफ

तुर्भे पारसिक बोगद्याचे काम लवकरच सुरू होणार

प्रकल्पग्रस्तांना मालकी हक्क देण्यासाठी सर्वेक्षण होणार

बीएमटीसीच्या पात्र कामगारांना १०० चौरस फुटाचे भूखंड

रेल्वे रुळांच्या बाजूने संरक्षक भिंती उभ्या करणार

नावाशेवा प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई अदा करणार

अपघाताला कारणीभूत ठरणारी सर्विस रोडच्या बाजूची बांधकामे तोडणार

दिवा जेटीच्या विकासासाठी ३२ कोटीचा निधी मंजूर