नवी मुंबईत धुवाधार!

नवी मुंबईत धुवाधार!

नवी मुंबई - दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा रविवार रात्रीपासून जोर वाढल्याने त्याने शहराला झोडपून काढले. २४ तासांमध्ये तब्बल २०० मिमी एवढा पाऊस पडल्याची नोंद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. हार्बर व ट्रान्स हार्बरलाही पावसाचा फटका बसल्यामुळे लोकल १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. 

सकाळी व दुपारी भरतीच्या वेळात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. वाशी सेक्‍टर ९ मधील शबरी कॉर्नरसमोरील रस्ते पाण्याखाली गेले होते. बेलापूर गावातही पाणी भरले होते. एनएमएमटीच्या बस डेपोमध्येही पाणी साठल्यामुळे प्रवाशांना पाण्यातच उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागली. 

ऐरोली व जुईनगर सब-वेमध्ये पंप नसल्यामुळे तेथे तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे येथील वाहतूक काही वेळ बंद होती. ऐरोलीत फ्लेमिंगो अभयारण्याच्या रस्त्यावर आंबेडकर भवनाच्या दिशेने जाणारा सब-वे पाण्याखाली गेला होता. 

सकाळी या मार्गावरून शाळेत जाणाऱ्या स्कूल बसचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. शहरात काही महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठल्यामुळे रिक्षा, कर, दुचाकी व बस बंद पडल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन काहीवेळी कोंडी झाली होती. २४ तासांमध्ये सोसायट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.

तुर्भे पोलिस ठाण्यात पाणी
तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यातही पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे पोलिसांना खुर्चीत ठाण मांडून कामकाज करावे लागले. पोलिस ठाण्याच्या आवारातही गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांचे नुकसान झाले. 

एपीएमसीत दुर्गंधी
एपीएमसी फळ व इतर काही मार्केटच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीस अडथळे येत होते. मार्केटमध्ये टाकलेली खराब फळे व भाजीपाला वाहून आल्याने व तो कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली.

लोकलचे वेळापत्रक कोलमडले  
पावसाचा फटका उपनगरी सेवेला बसल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेरूळावर पाणी साचल्याने हार्बर मार्गवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. पनवेल-सीएसटी आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. फलाटांवरही पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.

 ५० झाडे कोसळली
शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. शहारत ५० ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. आपत्कालीन विभाग तसेच अग्निशमन दलाने ती हटवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली. 

विभाग कार्यालयाला गळती
दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले असतानाच नवी मुंबई महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयालाही गळती लागल्याने पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर बादल्या ठेवल्या होत्या. दोन्ही मजल्यांवरील जिन्यांवर पावसाचे पाणी गळत असल्याने तेथेही बादल्या ठेवल्या होत्या.

२४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)
बेलापूर - १७१  
नेरूळ - १८७.८ 
वाशी - १७०.४
ऐरोली - २२५ 
एकूण सरासरी - १८८.५५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com