नवी मुंबईत कोसळधार सुरूच

नवी मुंबईत कोसळधार सुरूच

नवी मुंबई - सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने नवी मुंबई शहराला झोडपून काढले. सोमवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिल्याने सीबीडी-बेलापूर, नेरूळ, सीवूड्‌स, वाशी, ऐरोली येथील सखल भागांत पाणी साचले होते. सीबीडीतील सेक्‍टर ४ येथील बसडेपोला अक्षरशः तळ्याचे रूप आले होते. त्यामुळे प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत होती. एनएमएमटीच्या बसही यामुळे उशिराने धावत होत्या. 

सोमवारी दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर रात्री पुन्हा त्याने जोर धरला. सकाळपर्यंत पाऊस सुरू असल्यामुळे शहराच्या सखल भागातील अल्पउत्पन्न गटातील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे घरातील सामानाचे भिजून नुकसान झाले. सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरू असल्यामुळे सीबीडी सेक्‍टर ४ येथील सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. काही रस्त्यांवर गुडघाभर तर काही ठिकाणी कंबरेएवढे पाणी साचले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना या पाण्यातूनच मार्ग काढत शाळा गाठावी लागली. सीबीडी-बेलापूर सेक्‍टर ४ येथील बस डेपोमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे बसथांब्यावर प्रवाशांना पाण्यातच उभे रहावे लागत होते. दिघा, ऐरोली, घणसोली येथील सखल भागांत दुसऱ्या दिवशीही पाणी साचले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर पाणी ओसरले. नेरूळ सेक्‍टर २ मधील बैठ्या चाळींमध्ये पाणी घुसले होते; मात्र महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाच्या पथकाने सक्‍शन पंपाच्या मदतीने ते उपसले. 

दुसऱ्या दिवशीही शाळांना सुट्टी  
बेलापूर - नवी मुंबई परिसरात शुक्रवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी दिवसभर आणि मंगळवारीही कायम राहिल्याने महापालिकेने दुपारनंतर शाळांना सुट्टी जाहीर केली. पावसामुळे शहराच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने सोमवारीही दुपारनंतर शाळांना सुट्टी दिली होती. मंगळवारी सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसात भिजत शाळा गाठावी लागली. मात्र नंतर खबरदारी आणि सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेच्या शिक्षण विभागाने दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर केली.

सिडको, कोकण भवनला पाण्याचा वेढा
दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे सीबीडी-बेलापूरमधील सिडको व कोकणभवन परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. या पाण्याने इमारतींभोवती वेढा घातल्याचे दृश्‍य तयार झाले होते. पार्किंगच्या जागेत पाणी शिरल्यामुळे कोकणभवन परिसरात साचलेल्या पाण्यातच सरकारी वाहने उभी करावी लागली. सिडको भवनमध्येही साचलेल्या पाण्याची परिस्थिती दुपारपर्यंत कायम होती. दोन्ही कार्यालयांच्या आवारात सकाळी पाणी साचले होते. त्यामुळे सुरक्षेसाठी कोकणभवनमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्याचा परिणाम येथील कामांवर झाला होता. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने रात्री पहिला मजला पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com