गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, शहरातील २२ मुख्य विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

नवी मुंबई : गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, शहरातील २२ मुख्य विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विसर्जनासाठी तराफ्यांसह आवश्‍यक तेथे फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ७०० हून अधिक स्वयंसेवक, अग्निशमन जवान, लाईफगार्ड नेमण्यात आले आहेत. 

गुरुवारी (ता. १२) दहा दिवसांच्या घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्याकरिता पालिकेमार्फत २२ विसर्जन तलावांवर आवश्‍यक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पर्यावरणास उपयुक्त इटालियन गॅबियन वॉल रचना १४ मुख्य तलावांमध्ये करण्यात आली आहे. नागरिकांनी या विशिष्ट ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी तराफे तसेच फोर्कलिफ्ट उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरचीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. निरोपाची आरती व पूजेसाठी विसर्जन स्थळांवर टेबल मांडण्यात आले आहेत. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचाराची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. 

सुरक्षाविषयक खबरदारी
विसर्जन स्थळांवर ७०० हून अधिक स्वयंसेवक व अग्निशमन जवानांसह लाईफगार्डही तैनात असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळांच्या काठांवर आवश्‍यक ठिकाणी बांबूचे बॅरेकेटिंग केले आहे.

सुविधा मंच 
प्रत्येक विसर्जन स्थळांवर सुविधा मंच उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी गणेशभक्तांचे स्वागत व सूचनांसाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai ready for Ganesh immersion