खड्ड्यांमुळे नवी मुंबईचा वेग मंदावला

सुजित गायकवाड
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. या खड्ड्यांनी शहरातील नागरिकांची पाठ न सोडल्यामुळे आता कंबरदुखी आणि पाठदुखीमुळे नवी मुंबईकरांना रोज सकाळी कार्यालयात जाण्यासही विलंब होत आहे.

नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. या खड्ड्यांनी शहरातील नागरिकांची पाठ न सोडल्यामुळे आता कंबरदुखी आणि पाठदुखीमुळे नवी मुंबईकरांना रोज सकाळी कार्यालयात जाण्यासही विलंब होत आहे. शहरांतर्गत मुख्य रस्ते आणि नवी मुंबई शहराच्या मध्यभागातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्यामुळे सकाळी वाहतूक खोळंबा होत आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळी वाशी टोलनाक्‍यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  

या वर्षी खऱ्या अर्थाने जुलै महिन्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली; परंतु आता परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतरही शहरात खड्ड्यांची परिस्थिती सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नोडनिहाह विकसित झालेल्या नवी मुंबई शहरातील बहुतांश सर्वच नोडमधील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाशी उड्डाणपुलाखाली, वाशी रेल्वेस्थानकासमोरील सेक्‍टर- ३० येथील रस्ता, सीवूड्‌स, नेरूळ, सीबीडी उड्डाणपुलाखाली, सानपाडा रेल्वेस्थानकांसमोरील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. सीवूड्‌स येथील एलॲण्डटी उड्डाणपुलाखाली आणि सीबीडी येथील भुयारी मार्गाजवळील मेट्रोच्या उड्डाणपुलाखाली तर रस्ताच वाहून गेला आहे. या ठिकाणाहून वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. हे दोन्ही मार्ग कार्यालयात आणि रेल्वेस्थानकाच्या दिशेने जाणारी असल्याने, या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. 

शहरातील अंतर्गत रस्त्यांप्रमाणेच सायन-पनवेल महामार्गावरदेखील खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गावर नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमसमोरील उड्डाणपुलावर भले मोठे खड्डे पडल्यामुळे वेगात आलेली वाहने या ठिकाणी खड्ड्यांमध्ये जोराने आपटतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून नेरूळजवळच्या खिंडीतच वाहतूक कोंडीला सुरुवात होते. पुढे वाशी उड्डाणपुलाखाली, वाशी गाव आणि टोलनाक्‍यासमोरील रस्त्यांवर वाहन एका बाजूला कलंडेल, अशा स्वरूपाचे मोठे खड्डे पडले आहेत. अशा दयनीय अवस्थेत वाहनचालक प्रवास करीत असतात; मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनाला याबाबत थोडेही सोयसूतक नाही. 

महापालिकेला दर महिन्याला सर्व करांचा भरणा करत असतो; तरी शहरातील नागरिकांच्या वाट्याला आलेले खड्डे पावसाळा संपला, तरी पाठ सोडत नाहीत. या खड्ड्यांमुळे पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास सुरू झाला आहे. 
- यशवंत खिल्लारी, नागरिक, सीवूड्‌स. 

महापालिकेतर्फे रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू असून पावसामुळे खड्डे भरण्यात व्यत्यय येत आहे; मात्र तातडीने सर्व खड्डे लवकरात लवकर भरले जातील. तसेच जे खड्डे भरणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai slows down due to pits