नवी मुंबईची पाण्यासाठी धावाधाव 

नवी मुंबईची पाण्यासाठी धावाधाव 

नवी मुंबई - स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असूनही भविष्यात पाण्याची चणचण भासू नये याकरता नवी मुंबई महापालिकेने आत्तापासूनच जादा पाण्याचा शोध सुरू केला आहे. त्यात पेण तालुक्‍यातील हेटवणे धरणातील 150 एमएलडी पाणी मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाकडे मागणी केली आहे. त्याला जलसंपदा विभागानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना जादा पाणी मिळण्याची चिन्हे आहेत. 

नवी मुंबईतील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी महापालिकेने 2002 मध्ये खालापूर तालुक्‍यातील 450 दशलक्ष लीटर क्षमतेचे मोरबे धरण खरेदी केले. या धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे अनेक वर्षांपासून नवी मुंबईला कधीच पाणीटंचाईची झळ बसली नाही. अगदी राज्यात दुष्काळ असतानाही नवी मुंबईतील नागरिकांना मुबलक पाणी मिळत होते. शहरात झपाट्याने होणारी नवी बांधकामे, वाढणारी लोकसंख्या व औद्योगिकरणामुळे 2030 मध्ये शहराची लोकसंख्या 30 लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या मुबलक उपलब्ध असलेले पाणी भविष्यात कमी पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने आतापासूनच पाण्याची तजवीज करण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील हेटवणे धरणातील 150 एमएलडी पाण्याचा साठा नवी मुंबईसाठी आरक्षित ठेवण्याची मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी याला दुजोरा दिला आहे. या पाण्याचा योग्य मोबदला देण्यासही महापालिका तयार आहे. पालिकेच्या या मागणीला जलसंपदा विभागानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या हालचालींना वेग आहे. लवकरच हा प्रस्ताव महासभेपुढे सादर केला जाणार आहे. मोरबे धरणातून दररोज 415 एमएलडी पाणी घेतले जाते. यातील 310 एमएलडी पाणी नवी मुंबई शहराला पुरवले जाते. उर्वरित सिडकोच्या वसाहती, धरण परिसरातील व जलवाहिनी जाणाऱ्या परिसरातील गावांना दिले जाते. 

हेटवणेचा उद्देश फसला 
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्‍यातील हेटवणे धरण कृषी क्षेत्राच्या हेतूने शेतीला पाणी वापरण्याचा उद्देश जलसंपदा विभागाचा होता; मात्र धरण तयार होईपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती झाल्यामुळे धरणातून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी पाट बांधणे अशक्‍य झाले. त्यामुळे सध्या धरणातून सिडकोच्या वसाहतींसाठी पाणी घेतले जाते. सिडकोने याकरिता स्वतंत्र जलशुद्धीकरण व पंपिंग हाऊस तयार केले आहे. आता सिडकोपाठोपाठ नवी मुंबई पालिकेनेही या धरणातील पाण्याची मागणी केली आहे. 

पनवेलचे काय? 
पनवेल महापालिकेला सध्या निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत पनवेल महापालिकेनेही हेटवणे धरणातील पाणी मिळावे, यासाठी सिडकोला पत्र पाठवले आहे. मात्र अचानक नवी मुंबई महापालिकाही पाणी घेण्याच्या प्रवाहात आल्यामुळे पनवेल महापालिकेचे काय होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com