नवी मुंबईत आजपासून पाणी कपात रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

महापालिकेचे नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हा सुखद निर्णय घेतला आहे. मिसाळ यांच्या या निर्णयामुळे नवी मुंबईच्या जनतेला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

मुंबई : गेले आठवडाभर महापालिकेच्या मोरबे धरणात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे महिनाभर सुरू असणारी पाणीकपात अखेर रद्द करण्यात आली आहे. महापालिकेचे नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हा सुखद निर्णय घेतला आहे. मिसाळ यांच्या या निर्णयामुळे नवी मुंबईच्या जनतेला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. आजपासून पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. 

खालापूर तालुक्‍यात माथेरान डोंगरांच्या कुशीत वसलेल्या मोरबे धरणातून नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा केला जातो. दररोज ४५० एमएलडी पाणी धरणातून घेतले जाते. यातील १०० एमएलडी पाणी आजूबाजूची गावे, सिडको वसाहतींना पुरवल्यानंतर उर्वरित ३५० एमएलडी पाणी शहराला वापरले जाते. गेल्या वर्षी मोरबे धरणात चांगला पाऊस झाल्यामुळे धरण वाहू लागले होते. धरणामध्ये १९० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला होता; परंतू यंदाच्या वर्षी मान्सून लांबणीवर पडल्यामुळे संपूर्ण जून महिना कोरडाच गेला होता. 

परंतु धरणातून नियमितपणे तेवढेच पाणी घेतले जात होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याने हळूहळू तळ गाठण्यास सुरूवात केली होती. भविष्यात पावसाळा आणखी लांबणीवर गेला तर वर्षभर पाण्याचे नियोजन करण्यासाठी तत्कालिन आयुक्त डॉ. रामास्वामी. एन. यांनी दर मंगळवारी १० टक्के पाणीकपात करण्यास सुरुवात केली होती. रामास्वामी यांनी जेव्हा पाणीकपात सुरू केली तेव्हा धरणात फक्त ८२६ मी. मीटर इतकाच पाऊस पडला होता. त्यामुळे भरपावसात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते; परंतु गेल्या आठवडाभरात मोरबे धरणात मुसळधार पाऊस पडला आहे. 

पावसाळा सुरू झाल्यापासून धरणात आतापर्यंत दोन हजार ३७५ मी. मीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी ८४ मीटर उंचीपर्यंत पोहोचली आहे. १५३.९२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. ८८ मीटर उंचीपर्यंत पाणीपातळी पोहोचल्यास धरण वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे आता धरण तुडुंब भरण्यास अवघ्या चार मीटर पर्यंतच पाणीपातळी पोहोचण्याची गरज उरली असल्याची शहर अभियंते सुरेंद्र पाटील यांनी माहिती दिली. 

पाणीबाणी टळली
मोरबे धरणात कमी पाणीसाठा असल्यामुळे महापालिकेतर्फे दर मंगळवारी दहा टक्के पाणी कपात करण्यात येत होती. त्यामुळे दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे स्टोअर्स, तुर्भे नाका, घणसोली आणि वाशी येथील काही भागांना पाणी पुरवठा सुरळीत होण्यास दोन ते तीन दिवस लागत होते. परंतू आता पाणी कपात रद्द केल्याने नागरीकांवर भर पावसाळ्यात ओढावलेली पाणीबाणी टळली आहे.  

गेल्या आठवडाभर धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात कमालिची वाढ झाली आहे. धरण क्षेत्रातील पाणी साठा वाढल्यामुळे दर मंगळवारी होणारी पाणी कपात रद्द करण्याचे निर्देश दिले आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai water cut canceled from today