नवी मुंबई ही बुडीत खाती!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने नवी मुंबईकरांना अक्षरशः झोडपून काढले. सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४.३० पर्यंतच्या अवघ्या आठ तासांत तब्बल २२५.९२ मि.मी. इतक्‍या विक्रमी पावसाची नोंद नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली.

नवी मुंबई : दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने नवी मुंबईकरांना अक्षरशः झोडपून काढले. सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४.३० पर्यंतच्या अवघ्या आठ तासांत तब्बल २२५.९२ मि.मी. इतक्‍या विक्रमी पावसाची नोंद नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली. याआधी २८ जूनला नवी मुंबईत २४४ मि.मी. इतक्‍या पावसाची नोंद २४ तासांत झाली होती; मात्र बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने अवघ्या आठ तासांतच विक्रमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे ऐरोली, कोपरखैरणे, सानपाडा येथील भुयारी मार्गात कंबरेएवढे पाणी साठले होते. ठाणे-बेलापूर महामार्ग केपजेमिनी कंपनीजवळ पाण्याखाली गेला होता. सायन-पनवेल महामार्गाला नेरूळजवळ तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. 

मंगळवारी (ता. ३) दिवसभर सुरू असलेल्या संततधारेने संध्याकाळी रौद्ररूप धारण केले. मध्यरात्रीनंतर पावसाचा नवी मुंबईत जोर वाढल्याने शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साठण्यास सुरुवात झाली. पावसाचा सर्वात मोठा फटका सुरुवातीलाच सायन-पनवेल महामार्गाला बसला. महामार्गावर जुईनगरजवळ मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने व नेरूळजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर गुडघाभर पाणी साठले होते. त्यामुळे सकाळी मुंबई-पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या होत्या; तर शहरातील सीबीडी-बेलापूर एनएमएमटी बस डेपो पाण्याखाली गेला होता. वाशी, सेक्‍टर ९ येथे शबरी हॉटेलजवळ रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. ऐरोली शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या भुयारी मार्गाजवळ तळे निर्माण झाले होते. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने एक आलिशान चारचाकी फसली होती; मात्र प्रसंगावधान राखून चालकाने वेळीच चारचाकी मागे घेतल्याने अनर्थ टळला. शहरात दिवसभरात १५ पेक्षा जास्त ठिकाणी पाणी भरल्याच्या घटनांची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली. 

गणपतींचे वेळेआधीच विसर्जन 
सिडकोतर्फे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाच्या कामाचा पारगाव, डुंगी आणि भंगारपाडा येथील ग्रामस्थांना फटका बसला. पारगावातील तब्बल दहा घरांमधील गणेशमूर्तींचे वेळेआधीच विसर्जन करण्याची नामुष्की या ग्रामस्थांवर ओढावल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गावातील आत्माराम तारेकर यांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांनी आपल्या घरातील दहा दिवसांच्या बाप्पाला सोबत बाहेर आणले; परंतु पुराचे पाणी वाढल्यामुळे त्यांच्यासहीत दहा गणपतींचे वेळेआधीच विसर्जन करावे लागले, अशी माहिती माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी दिली. सिडकोच्या या कारभारामुळे पारगाव ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तसेच डुंगीमध्ये गणेशोत्सवासाठी परतलेल्या तब्बल २५० ग्रामस्थांच्या घरांत पाणी शिरल्याने त्यांना पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी होडीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. 

एपीएमसी मार्केटला फटका
गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळ मार्केटलाही फटका बसला. दोन्ही मार्केटमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. मार्केटमधील गटारे स्वच्छ नसल्यामुळे पाण्याच्या निचरा न झाल्याने पावसाचा जोर झाल्यानंतरही दुपारपर्यंत पाणी साठलेलेच होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना भिजलेला भाजीपाला व फळे फेकून द्यावी लागली. 

उलवे रेल्वे मार्गाला फटका
दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा नेरूळ-उलवे रेल्वे मार्गालाही चांगलाच फटका बसला. उलवेच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गिकेवरील रुळाखालील माती पावसाने भिजल्यामुळे खचली होती. नवी मुंबई महापालिका मुख्यालयाजवळच्या भुयारी मार्गाजवळ पावसामुळे माती खचण्यास सुरुवात झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai is a weird account!