नवी मुंबईचा कायापालट करणार

अशोक गावडे
अशोक गावडे

राष्ट्रवादी काँग्रेमधून ज्यांना जायचे होते, ते गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षबांधणी करण्यात मला यश आले. हे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पेरलेले होते. ते पीक आज मी नवी मुंबईत घेत आहे. जनता-जनार्दन पक्षांतर करणाऱ्यांचा सूड नक्की घेईल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक गावडे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केली. नवी मुंबईत गेली अनेक वर्षे न सुधारलेली आरोग्य व्यवस्था व रखडलेली शिक्षण व्यवस्था सुधारण्याचे काम आपण करणार असल्याचा निर्धार गावडे यांनी या वेळी बोलून दाखवला. फसवणुकीचे प्रसंग टाळण्यासाठी कायदे सल्लागार मंडळाची स्थापना, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र व सांस्कृतिक मंडळ स्थापन करून शहराला सांस्कृतिक चेहरा देण्याचे काम करणार असल्याचे आश्‍वासन गावडे यांनी दिले.   

राज्यातील राजकारणाबाबत आपले मत काय? 
राज्यात आणि देशात सध्या सुरू असलेल्या राजकारणाला वेगळे वळण लागत चालले आहे. राजकारण केव्हाही मैत्रीपूर्ण खेळले जाते. मात्र सध्या कुठे तरी एखाद्याची खपली काढून त्याला अडचणीत आणून घाणेरड्या पद्धतीने राजकारण खेळले जात आहे.  काही जणांनी समाजकारणात अथवा राजकारणात केलेल्या चुका किंवा निर्णय कायद्याच्या फूटपट्टीवर तपासून त्या व्यक्तीला शिक्षा करण्याचे काम सध्याच्या सरकारतर्फे केले जात आहे. त्या भीतीमुळे बरीचशी मंडळी इकडून तिकडे उड्या मारत आहेत. गेले ७० ते ७५ वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीसारख्या समविचारी पक्षांची सत्ता होती. मात्र याआधी असे कधीच झालेले नाही. अगदी दिल्लीपासून ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या निवडणुकीत भाजप सरकार कायद्याला गुंडाळून स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आहेत.

दगाबाजांबद्दल काय वाटते? 
विरोधी पक्ष कधीच संपत नाही. विरोधी पक्षात नेहमी वाढ होत असते. व्यक्ती संपते, पक्ष संपत नाही. ज्या झाडाखाली मी वाढलो, मोठा झालो त्या झाडाला आज मी का सोडायचे? ते माझ्या आई-वडिलांप्रमाणे आहे. अशा आई- वडिलांना फक्त सत्ता नाही म्हणून सोडायचे का? असे असेल तर मग राजकारण्यांची संज्ञा अशा लोकांना लागू होत नाही. शरद पवारांचे ईडीच्या चौकशीत नाव येणे हे धडधडीत खोटे आहे. ज्या व्यक्तीने केव्हाही जिल्हा बॅंक अथवा शिखर बॅंकेचे सदस्यत्व आणि संचालक पद घेतलेले नाही, अशा व्यक्तीचे नाव चौकशीत कसे येते. ईडीला येडे करणारे आमचे नेते शरद पवार आहेत. त्यामुळे राज्यभरातून पवारांविषयी सहानुभूतीची लाट उसळली. यातून भाजप सरकार कोणत्या पद्धतीने कायद्यांचा वापर करून सरकारच्या यंत्रणांमधून लोकांना कसे अडचणीत आणतो हे उघड झाल्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फायदाच होईल.

शिवसेनेतील नाराजीचा फायदा होईल का?
अगदी शिवसेना व भाजप युतीमागेही ईडीचा धाक दाखवलेले असल्याचे नाकारता येत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केव्हाही गुडघे टेकवले नव्हते. मात्र आत्ताची शिवसेना सपशेल गुडघ्यावर आली आहे. आता शिवसेनेत गेलेले आमचेच सहकारी आहेत. तरीसुद्धा नवी मुंबईत त्यांना एकही जागा देऊ शकले नाहीत. याचे आश्‍चर्य वाटत आहे. शिवसेनेने मदत केल्यास स्वागत आहे. 

प्रचारासाठी कमी वेळ मिळाला?
गेल्या ४० वर्षांत नवी मुंबईत घाटावरचा उमेदवार केव्हाच नव्हता. पश्‍चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकणस्थ व विदर्भाला केव्हाच नेतृत्व दिलेले नाही. आता माझ्या रूपाने मिळालेली संधी ही नैसर्गिकरित्या मिळालेली संधी आहे. त्यामुळे या घाटावरच्या समाजाच्या नागरिकांमध्ये एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली आहे. अनेकांचे प्रतिसाद मला रोजच्या रोज येत आहेत; परंतु माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. गेल्या महिन्यात माझ्या पक्षाची जी वाताहत झाली. विस्कटलेली घडी बसवताना मला खूप कमी वेळ मिळाला. या वेळेत पक्षाचे ध्येय व चांगल्या बाजू सर्वांपुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना संजीवनी म्हणून ठरलेली साडेबारा टक्के योजना आमच्या शरद पवार साहेबांनी आणली. भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरी देण्याचे निर्णय शरद पवार यांचे. याशिवाय मोरबे धरण तयार करण्याची दृष्टीही पवार यांची आहे.

पक्षबांधणीत अडथळा आला का?
राष्ट्रवादीतून झालेल्या पक्षांतरामुळे मला आव्हाने नाही, तर खरा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. यातून मला शिकायला व अनुभवायला मिळत आहे. गणेश नाईक दुसऱ्या पक्षात गेले, याचे मोठे दुःख आहे. त्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. मात्र शरद पवार यांच्या कर्तृत्वामुळे कमी दिवसांत मला पक्ष उभा करता आला. त्यांनी एवढी वर्षे नवी मुंबईत जे पेरले होते ते पीक आज मला मिळाले. राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांचा राग आजही अनेक पवार समर्थकांच्या मनात आहे. प्रचाराला फिरताना हा राग मला अनेकांच्या बोलण्यातून, भेटीतून जाणवतो. आई-वडिलांनी वाढवायचे आणि परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडून असे निघून जाणे, ही भावना प्रत्येक पवार समर्थकांमध्ये आहे. त्याचा वचपा नाईकांच्या आणि महायुतीच्या विरोधात मतदान करून मतदार काढतील.

हे सरकार फसवणूक करते का?
भाजपने ३७० कलमाचा बागुलबुवा केला. ३७० कलम म्हणजे काय हेच सर्वसामान्य जनतेला ठाऊक नाही. भाजपने ३७० कलमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक केली. हा ३७० कलम सर्वसामान्यांच्या फायद्याचा नसून देशातील बलाढ्य श्रीमंतांसाठी व व्यावसायिक व उद्योजकांसाठी आहे. त्यांना काश्‍मीरमध्ये जमिनी घेता येतील, हा एवढाच त्यांचा हेतू होता. जम्मू-काश्‍मीरमध्ये आम्ही आजही फिरायला जात होतो. उद्याही जाणार. तिकडे गेल्यावर भाड्याच्या घरातच राहावे लागणार आहे. एमआयडीसी बंद अवस्थेत आहे. विदर्भ मराठवाड्यात पाणीटंचाई, शेतमालाला बाजारभाव नाही, बाजार समित्या बरखास्त करून व्यापाऱ्यांना उघडे पाडणे, शेतकऱ्याला असुरक्षित बाजारपेठा उपलब्ध करणे ही सर्व भाजप सरकारने केलेला आतापर्यंतचा विकासच आहे; परंतु भाजपमध्ये असलेले मंत्री आणि त्यांच्या व्यावसायिकांच्या विकासाचा आलेख वाढलेला आहे. त्यामुळे त्यांचा विकास चांगला झालेला आहे.

सहकार क्षेत्राबाबत काय वाटते?
भाजप सरकारने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मोडीत काढली आहे. मुळात या संस्थेची शेतकऱ्यांना अतिशय गरज आहे. ज्या ठिकाणी नियंत्रण आणण्याची गरज आहे, तिकडे नियंत्रण न आणता दुसरीकडे नियंत्रण ठेवले जाते. फूटपाथवर बसलेल्या व्यावसायिकांमुळे बाजार असमतोल होत आहे. भाजपला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जेवढ्या अर्थसाह्य करणाऱ्या संस्था आहेत त्या मोडीत काढायच्या आहेत.

तुमच्या योजना काय?
शहरात अनेक भागात चांगल्या दर्जाचे कौशल्य अंगात असलेले तरुण-तरुणी राहतात. मात्र, ते गरीब असल्यामुळे अथवा मागास असल्याने त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. अशा होतकरू तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र तयार केले जाणार आहे. केंद्राच्या माध्यमातून आणण्यासाठी व्यासपीठ तयार केले जाणार आहे. 

फसवणूक कशी थांबणार? 
नवी मुंबईत अनेकदा लोकांची फसवणूक होत असते. कायद्याचे उचित ज्ञान लोकांना नसल्यामुळे ते कायद्याचे ज्ञान असलेल्या लोकांकडे जातात. मात्र, काही लोक त्याचा गैरफायदा घेऊन लोकांना फसवतात; परंतु अशा लोकांसाठी माझ्याकडे वकिलांची असलेली टीम वापरून एक संस्था निर्माण करणार आहे. लोकांना चांगल्या पद्धतीचा मोफत सल्ला दिला जाणार आहे.

कोणते स्टार प्रचारक उतरणार?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, ज्येष्ठ नेते नवाब मलिक असे स्टार प्रचारक प्रचारासाठी येणार आहेत. यापैकी कोल्हे हे रॅलीमध्ये सहभागी होऊन तरुणांना आवाहन करणार आहेत. मिटकरी हे त्यांच्या बुलंद भाषणबाजीने प्रचार करणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com