ई-वाहनांकडे नवी मुंबईकरांची पाठ

ई-वाहनांकडे नवी मुंबईकरांची पाठ
ई-वाहनांकडे नवी मुंबईकरांची पाठ

नवी मुंबई : केंद्र सरकारने इलेक्‍ट्रिक वाहनांच्या अनुदानासाठी ‘फेम २’ योजना लागू करूनही नवी मुंबईकरांनी या वाहनांकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांच्या चढ्या किमती आणि चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध नसल्याने, सद्यस्थितीत नवी मुंबईत केवळ १५२ इलेक्‍ट्रिक दुचाकी आणि एका इलेक्‍ट्रिक कारची नोंदणी झाली. 

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच भविष्यातील पारंपरिक इंधनाचा होणारा तुटवडा लक्षात घेता केंद्र सरकारने इलेक्‍ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्याकरिता १ एप्रिलपासून फेम २ योजना लागू केली. या योजनेद्वारे इलेक्‍ट्रिक वाहनांना अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारने २०२२ पर्यंत दहा हजार कोटींची तरतूद केली असून, जीएसटीमध्ये सवलतही देण्यात आली आहे. भविष्यात या वाहनांचा टोल ५ वर्षे रद्द करण्याचाही प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी पुरेशी चार्जिंग स्टेशन्स आणि दुचाकी, कारच्या न परवडणाऱ्या किमती यामुळे या वाहनांची खरेदी थंडावल्याचे चित्र आहे. उपप्रादेशिक वाहतूक कार्यालयातील नोंदीनुसार, दर वर्षी वाहनांच्या संख्येत वाढ होते. यंदादेखील या संख्येत ९.२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येत ४३ हजार ४५ वाहनांची भर पडली आहे; तर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या नोंदणीत १८ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. 

इलेक्‍ट्रिक वाहनांच्या चढ्या किमती
इतर वाहनांच्या तुलनेत ई-वाहनांची विक्री होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. केवळ ०.५ टक्के ई-वाहनांची विक्री होते. दुचाकी ४० हजारांपासून उपलब्ध आहेत; तर चारचाकीची किंमत ७ ते २५ लाखांच्या दरम्यान आहे. त्यामुळे चारचाकीपेक्षा दुचाकी खरेदीकडे लोकांचा अधिक कल आहे.

चार्जिंग स्टेशन नाहीत
नवी मुंबईत वाशीत ३, पनवेल हायवेजवळ एक, सीवूडस ग्रॅंड सेंट्रल मॉलमध्ये १, कोपरखैरणे १ अशी जवळपास सहा चार्जिंग स्टेशन आहेत. चार्जिंग स्टेशन्समध्ये वाढ झाल्यास ई-वाहन खरेदीदेखील वाढू शकते, असे वाहनविक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

एकदा चार्जिंग केल्यास ई-वाहने १०० ते ४०० किलोमीटर अंतर सहज पार करतात. या चारचाकी वाहनांचा वेग ताशी १२० किमी; तर दुचाकींचा वेग दर ताशी ५० ते ५५ किमी आहे. सध्या ई-वाहनांना म्हणावी तशी मागणी नाही; मात्र केंद्र सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा विचार करता, पुरेसे चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध झाल्यास येत्या एक-दोन वर्षांत ई-वाहनांची मागणी वाढेल. 
- हर्ष कृपलानी, परिचालन व्यवस्थापक, ग्रीन एनर्जी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com