नौदल पोलिसांची पोलिसांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई - दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी नौदलातील दोन पोलिसांना पकडले. त्यावर "मराठीत लिहिलेली पावती हिंदीत का नाही' असे दरडावून विचारत नौदल पोलिसांनी दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केली. या मुजोर नौदल पोलिसांनी एका पोलिसाचा तर हातही पिरगाळला आणि दुसऱ्याच्या डोक्‍यावर चापट लगावत त्याची टोपी खाली पाडली. कुलाबा पोलिसांनी सरकारी नोकराला मारहाण केल्याप्रकरणी या दोन नौदल पोलिसांना अटक केली आणि नंतर जामिनावर सोडले.

जग्तार दिदारासिंग व नरेंद्रसिंग तोमर अशी या दोन नौदल पोलिसांची नावे आहेत. कुलाबा वाहतूक पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक नवनाथ गोसावी हे शुक्रवारी रात्री कुलाबा येथील पी. डिमेलो मार्गावर तैनात होते. रात्री 8च्या सुमारास त्यानी जग्तार सिंग चालवत असलेली दुचाकी गोसावी यांनी अडवली. त्यांच्याकडे चालक परवाना नव्हता. जग्तार सिंग व त्याच्यामागे बसलेला तोमर हे दारू प्यायल्याचा संशय पोलिसांना आला. "ब्रेथ ऍनालायझर'ने सिंगची तपासणी केली असता, तो दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पुढे मोटार वाहन कायद्यानुसार 2500 रुपये अनामत रकमेची पावती तयार करून त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्या वेळी "ही पावती हिंदीत का नाही?' असे सांगत सिंगने स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

Web Title: navy police beating to police