फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

लोकशाहीत ज्यांना आम्हीच राहू, आम्हीच राहू असं वाटत होतं, त्यांना हा धडा आहे - नवाब मलिक 

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. यानंतर महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा रस्ता मोकळा झालाय. अशातच आज संध्याकाळी महाविकास आघाडीतर्फे नेता निवडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या नावावर नेता म्हणून  शिक्कामोर्तब होणार आहे. याबद्दलची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. 

कालपर्यंत भाजप आमच्याकडे संख्याबळ आहे असं बोलत होती. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर संपूर्ण चित्र बदललं आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. लोकशाहीत ज्यांना आम्हीच राहू, आम्हीच राहू असं वाटत होतं, त्यांना हा धडा आहे असं देखील नवाब मलिक यांनी पत्रकारांसमोर म्हटलंय. 

महाराष्ट्र म्हणजे कर्नाटक, गोवा किंवा मणिपूर नाही याचा पुनरुच्चार नवाब मलिक यांनी केला. दरम्यान आज होणाऱ्या नेता निवडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असे आदेश शरद पवार यांनी सर्वांना शिवसेनेच्या भाषेत दिले आहेत हे देखील नवाब मलिक यांनी नमूद केलंय.      

भाजपचा अहंकार लोकांनी संपवला. आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवरायांचं आदर्श राज्य येईल. शिवसेनेचा जन्म हा महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी झालाय. महाविकास आघाडीचं येणारं सरकार हे दीर्घकालीन असेल याची ग्वाही नवाब मलिक यांनी दिली. 

Webtitle : nawab maliks first reaction after devedra fadanavis resigned as CM of Maharashtra

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nawab maliks first reaction after devedra fadanavis resigned as CM of Maharashtra