स्थायी समिती राष्ट्रवादी-शिवसेनेत "तू तू मैं मैं' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नवी मुंबई - महापालिका शाळांतील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पूरक आहार पुन्हा राजकीय वादाचे कारण ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासन आणि शिवसेना न्याहरीसाठी आग्रही असताना सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र स्थायी समितीत आज पुन्हा चिक्कीसाठी आग्रह धरला. विशेष म्हणजे चिक्कीच्याच मुद्द्यावर राष्ट्रवादीने प्रशासनाला धारेवर धरल्याने गौडबंगाल काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

नवी मुंबई - महापालिका शाळांतील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पूरक आहार पुन्हा राजकीय वादाचे कारण ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासन आणि शिवसेना न्याहरीसाठी आग्रही असताना सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र स्थायी समितीत आज पुन्हा चिक्कीसाठी आग्रह धरला. विशेष म्हणजे चिक्कीच्याच मुद्द्यावर राष्ट्रवादीने प्रशासनाला धारेवर धरल्याने गौडबंगाल काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

राज्य सरकार शालेय पोषण आहार योजनेनुसार पालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना माध्यान्न भोजन दिले जाते; तर त्याला पूरक आहार म्हणून चिक्कीवाटप करण्यात येते. दरम्यानच्या काळात महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पूरक आहारात चिक्कीऐवजी न्याहारी देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार "इस्कॉन' या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने उपमा, शिरा असे तत्सम पदार्थ चिक्कीच्या दरातच दिले जाणार होते. मात्र या प्रस्तावाला सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केल्यामुळे सर्वसाधारण सभेत न्याहारीचा प्रस्ताव बारगळला. त्यामुळे न्याहारी म्हणून पुन्हा चिक्कीवाटप सुरू झाले. परंतु त्या कंत्राटाची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर त्याला मुदतवाढ न दिल्यामुळे चिक्कीवाटप थांबवण्यात आले. या मुद्द्यावर स्थायी समितीत देवीदास हांडे-पाटील यांनी प्रशासनाला फैलावर धरत जाब विचारला. चिक्कीवाटप प्रस्तावाच्या मुदतवाढीच्या मुद्द्यावर प्रशासन कशी चालढकल करते, हे उदाहरणासह स्पष्ट केले; तर शेंगदाण्याच्या चिक्कीच्या प्रस्तावाचा शिवसेनेने तीव्र शब्दात निषेध केला. चिक्कीपेक्षा न्याहारी अधिक पौष्टिक असल्याचा मुद्दा शिवसेनेच्या शिवराम पाटील यांनी मांडला. त्यावर संतापलेल्या सभापती सुरेश कुलकर्णी यांनी प्रशासनाला नवीन निविदा तयार होईपर्यंत जुन्या प्रस्तावानुसार चिक्कीवाटप करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्याच्या निकटवर्तीयाला चिक्कीचे कंत्राट दिले असल्याने तो पक्ष चिक्कीसाठी आग्रही असल्याचा आरोप शिवसेना करीत आहे. त्यामुळे "चिक्की'चे राजकारण काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

प्रशासनाने पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पुन्हा चिक्कीचे वाटप करावे. दिवसभराच्या जेवणानंतर मूलांना पूरक आहार मिळावा याकरिता चिक्की सुरू केली आहे. परंतु काही जण स्वतःच्या फायद्यासाठी चिक्कीला विरोध करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांचा हा हेतू सफल होऊ देणार नाही. 
- देवीदास हांडे-पाटील, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

महासभेत प्रशासनाने न्याहारीचा प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव नामंजूर करताना चिक्की वाटपाच्या उपसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनावर दबाव टाकून चिक्कीवाटप सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे शिवसेना खपवून घेणार नाही. 
- शिवराम पाटील, नगरसेवक, शिवसेना 

Web Title: NCP and shivsena politics Standing Committee