४,५०० कोटींची होळी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

आरोप-प्रत्यारोपांच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादीने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे...

ठाणे - ठाणे पालिका निवडणुकीसाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेवर कचऱ्याच्या प्रश्‍नावरून गुरुवारी जोरदार हल्ला चढवला. विकासाच्या गोंडस नावाखाली २५ वर्षे ठाण्याची सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेने ठाण्याचे वाटोळे केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला.

नागरिकांच्या खिशात हात घालून चार हजार ५०० कोटी कचऱ्यात घालवले आहेत. त्याचे कोणतेही नियोजन न केल्याने नागरिकांना हा भुर्दंड सहन करावा लागला आहे. २५ वर्षांत कचऱ्याची समस्या सोडवता आली नसतानाही येत्या पाच वर्षांत ही समस्या सोडवू, असे खोटे आश्वासन दिले जात आहे. नागरिकांच्या पैशांची होळी करणाऱ्या शिवसेनेला मतदारांनी घरी बसवून बोंबलायला लावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे. 

पालिकेत २५ वर्षे सत्ता भोगणारी शिवसेना नागरिकांकडे सत्तेसाठी भीक मागत आहे. नागरिकांचा २५ वर्षे विश्वासघात केला, खोटी आश्वासने देऊन फसवणूक केली. यानंतरही आगामी पाच वर्षांची सत्ता द्यावी, असे आवाहन नागरिकांना केले जात आहे. शिवसेनेचे हे आवाहन म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी विखारी टीका परांजपे यांनी केली.

 सत्ताधाऱ्यांसमोर ठाण्यातील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कसलेही नियोजन नाही. नागरिकांनी पाच वेळा शिवसेनेच्या हाती सत्ता दिली; परंतु शिवसेनेला ठाण्यातील कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी डम्पिंग निर्माण करता आले नाही, असा आरोप त्यांनी केला. कर्मचाऱ्यांचा पगार, कचरा संकलन, कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा विभागामार्फत वर्षाला १७५ कोटी खर्च केले जातात; परंतु खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाचे प्रमाण अवघा एक टक्का आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसू शकला नाही. त्यामुळे जेएनएनयूआरएममार्फत घनकचऱ्याबाबत नवीन प्रकल्प हाती घेतले होते. यासाठी पालिका प्रशासनाने सेवा शुल्कही वसूल केले होते; मात्र अजून त्याचाही ताळमेळ बसला नसल्याने पालिकेच्या या विभागाला २५ वर्षांत चार हजार ५०० कोटींचा चुराडा करावा लागला आहे. हा पैसा नागरिकांनी त्यांच्या खिशातून कराच्या रूपाने दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नागरिक शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही परांजपे यांनी व्यक्त केला.  या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

शिवसेनेच्या नेत्यांना नागरिकांच्या समस्या दिसल्या नाहीत; मग नेते २५ वर्षे झोपा काढत होते का? -आनंद परांजपे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: NCP Attack on Shiv Sena