गणेश नाईक फिरकलेच नाहीत; भाजप प्रवेशाबाबत संभ्रमवस्था

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

संदीप नाईकांचा राजीनामा 
राष्ट्रवादीचे ऐरोली विधानसभेचे आमदार संदीप नाईक यांनी आज विधानपरीषद अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची भेट घेऊन राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. त्याआधी नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली.

नवी मुंबई : गेले दोन दिवस भाजप प्रवेशाच्या चर्चांचा धुरळा उडवल्यानंतर प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक फिरकलेच नाहीत. पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांनी नाईकांची तब्बल तीन तास प्रतिक्षा केल्यानंतर ते येणार नसल्याची माहिती पदाधिकाऱ्यांना मिळाली. नियोजित बैठकीला गणेश नाईकांनी पाठ दाखवल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप नाईक हे राष्ट्रवादीचे 57 नगरसेवकांना सोबत घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या दोन दिवसांपासून उत आला होता. प्रसिद्धी माध्यमे आणि समाजमाध्यमांवर मध्ये तर त्यांच्या प्रवेशाच्या तारखा व वेळा देखील जाहीर झाल्या. त्यामुळे भारावलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट महापौर निवासस्थानात बैठक घेऊन भाजपमध्ये जाण्याचे पक्केही केले. ठरलेला निर्णय गणेश नाईकांना सांगण्यासाठी महापे येथील व्हाईट हाऊसमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सकाळी 11 वाजता नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते झाडून हजेरी लावली होती. सोबत अनेक नगरसेवकही होते. पाहता पाहता व्हाईट हाऊसमधील सभागृह खचाखच भरून गेला. कार्यकर्त्यांना बसायला जागा नसल्यामुळे अनेक जण भितींला पाठ चिकटवून उभे होते. 11 चे दोन वाजून गेले तरी गणेश नाईक आलेच नाही.

अखेर महापालिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनवणे, सभागृह नेते रविंद्र इथापे व नगरसेवक सुरज पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्याला सर्वांना भाजपमध्ये जायाचे असल्याचे पुनरुच्चार करीत आठवण करून दिली. तसेच कोणत्याही परिस्थितीत गणेश नाईकांच्या मागे उभे राहायचे आहे असे आवाहन सूतार यांनी केले. त्यावर पुन्हा सर्वांची हात वर करून मते जाणून घेतली. मात्र भाषणे संपल्यानंतर गणेश नाईकांना यायला जमत नसल्याचे सांगून बैठक आटोपती घेतली. परंतू सकाळ पासून दुपारपर्यंत जमलेल्या कार्यकर्त्यांना गणेश नाईकांनी पद्धतशीरपणे फिरवलेली पाठ लक्षात आली आहे. नाईकांनी समोर येऊन बोलण्यास टाळल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

संदीप नाईकांचा राजीनामा 
राष्ट्रवादीचे ऐरोली विधानसभेचे आमदार संदीप नाईक यांनी आज विधानपरीषद अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची भेट घेऊन राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. त्याआधी नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ganesh Naik may be entered BJP