अरे किती हिणवणार? भाजपच्या आंदोलनाची रोहित पवारांकडून खिल्ली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

"आधी म्हणायचं 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? आणि आता महाराष्ट्र बचावचे गळे काढत अंगणालाच रणांगण करायचं. अरे किती हिणवणार? " 

मुंबई : आज भाजप महाराष्ट्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. मेरा आंगण ते रणांगण असं आमचं धोरण असेल, असं भाजपनं स्पष्ट केलं आहे. राज्यातली आणि मुंबईतील कोरोनाची समस्या पाहता दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यावरुनच राज्य सरकार निष्क्रिय झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. या भाजपच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीका केलीय. ट्विट करुन रोहित पवारांनी भाजपच्या आंदोलनावर निशाणा साधला आहे. 

आधी म्हणायचं 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?' आणि आता 'महाराष्ट्र बचाव'चे गळे काढत अंगणालाच रणांगण करायचं, अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. 

महामारीतही 'या' कंपन्यांमध्ये आहे नोकरीच्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळतेय बढती आणि बोनसही

 

अरे किती हिणवणार? रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कोरोना योद्धांचा आंदोलनाच्या नावाने अपमान तरी करू नका. राज्याचा एवढाच कळवळा आहे तर संकटात तरी एकदिलाने काम करत #महाराष्ट्रघडवूया!, असं म्हणत आमदार रोहित पवारांनी भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. 

आज लाखो कार्यकर्ते, पदाधिकारी आपापल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील त्या फलकांवर सरकारविरोधात घोषणा लिहिलेल्या असतील. राज्यातील सामान्य माणसालाही काही म्हणायचं आहे. त्या सगळ्यांना विनंती केली आहे की, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आपल्या घराच्या अंगणात आपण फलक घेऊन उभं राहायचं आहे. मेरा आंगण ते रणांगण असं आमचं धोरण असेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेने आपल्या घराबाहेर येऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनो सर्वात मोठी बातमी, BMC म्हणतेय...

नितीन नांदगावकर यांच्याकडून आंदोलनाचा जाहीर निषेध 

भाजपला झालेली पोटदुखी असं म्हणत नांदगावकर यांनी आंदोलन करायची ही वेळ नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जनतेची मेहनत वाया घालवू नका. तुमचे गलिच्छ राजकारण करण्याची ही वेळ नाही. पोलिसांचा , डॉक्टर ,नर्स , पालिकेचे कर्मचारी, प्रशासनाचे अधिकारी सर्वांचा विचार करा. एवढे स्वार्थी बनू नका. स्वतःच्या कार्यकर्त्यांना बळीचा बकरा करून त्यांना आंदोलने करण्यासाठी फतवा काढला जातो. एवढी जळफळाट कशासाठी? नेमकं काय साध्य करायचे आहे? ही षडयंत्र रचण्याची वेळ नाही, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

एकमेकांच्या सोबत काम करण्याची संधी निदान आता ह्या महामारीत गमावू नका .
जनतेला सर्व काही दिसतंय. ज्यांना महाराष्ट्रातील ना जनतेची काही पडली आहे ना पोलिसांची त्या सर्व भाजपच्या नेत्यांचा जाहीर निषेध नांदगावकर यांनी केला आहे. 
फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजून केंद्रातील सरकारला खूश करण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करून त्यांच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरून त्यांचा आणि परिवाराचा जीव धोक्यात घालून गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका करत नितीन नांदगावकर यांनी भाजपच्या आंदोलनाचा जाहीर निषेध केला आहे.

भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट

विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  राजभवन येथे जात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असून कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था दुसरीकडे शेतमाल पडून आहे, त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

ncp leader rohit pawar targets BJP in context with their agitation against mahavikas aaghadi 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader rohit pawar targets BJP in context with their agitation against mahavikas aaghadi