'राष्ट्रवादी'चे खासदार अमोल कोल्हे राज ठाकरेंच्या भेटीला

'राष्ट्रवादी'चे खासदार अमोल कोल्हे राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी  भेट घेतली. मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची शक्‍यता वर्तविली जात असून,  कोल्हे आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या सरकारच्या विरोधात राज ठाकरे यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.

शिरूरमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील येथून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. कोल्हे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत झाली. डॉ. कोल्हे हे ५८,४८३ मतांनी विजयी झाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ माळी समाजाची संख्या लक्षणीय आहे. डॉ. कोल्हे यांनी मालिकांमधून छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली असल्याने सर्वच समाजांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी शिरूरचा गड काबीज केल्याचे मानले जाते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. कोल्हे यांनी राज यांची भेट घेतल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत राज यांच्या सभांचा चांगला ‘इम्पॅक्‍ट’ झाल्याने आभार मानण्यासाठी त्यांची भेट घेतली.
- डॉ. अमोल कोल्हे, ‘राष्ट्रवादी’चे शिरूरचे खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com