आव्हाडांची विकासकामे फक्त स्वप्नरंजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पालिकेच्या माध्यमातून झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा आव्हाड यांनी सपाटा लावल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे...

ठाणे - ठाण्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा कलगीतुरा चांगलाच रंगात आला आहे. ठाण्यातल्या परिवहनचे वाभाडे काढत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर टीका केली. त्याला शिवसेनेकडून तितकेच जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मतदानापर्यंत आरोप-प्रत्यारोपांची ठाण्यात चांगलीच राळ उठणार असल्याचे एकूण वातावरणावरून दिसत आहे. पालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेल्या कामाचे श्रेय घेणारे जितेंद्र आव्हाड आमदार म्हणून किती यशस्वी आहेत, हे तिथल्या नागरिकांना चांगलेच माहिती असल्याची खोचक टीका करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांची विकासकामे म्हणजे ‘मुंगेरीलाल के सपने’ असल्याचा टोला लगावला. 

निव्वळ स्वप्न बघून उपयोग होत नाही, तर त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी जीव ओतून काम करावे लागते. आव्हाड आमदार म्हणून किती यशस्वी आहेत, याची कल्पना या परिसरातील नागरिकांना आहे. अशा वेळी फक्त ‘मुंगेरीलाल के सपने’ पाहणाऱ्या नेत्यांच्या ऐवजी प्रत्यक्षात विकासकामे करणाऱ्या शिवसेनेसोबत नागरिक राहतील असा आपल्याला विश्वास असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आव्हाड यांनी शिवसेना आणि पालकमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार डॉ. शिंदे यांनी, पालिकेच्या माध्यमातून झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा आव्हाड यांनी सपाटा लावला आहे. मुळात शिवसेना विकासाच्या बाजूने असल्याने या विकासकामांच्या पाठीशी सत्ताधारी म्हणून उभी राहिली याकडे आव्हाड यांनी दुर्लक्ष करू नये, असा इशारा  दिला.

Web Title: NCP & shiv sena in TMC