कोकणात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद कायम : तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

कोकणात भास्कर जाधव हे आमचे मजबूत नेते असून, त्यांच्या नेतृत्वाखाली तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवत आहे. त्यामुळे कोकणातील एक विद्यमान आमदार, मोठा नेता भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांत काहीच तथ्य नाही

मुंबई : कोकणात राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पडणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भास्कर जाधव पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्याचे नेते आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली चांगले यश मिळवू, असा दावा करत कोकणात पक्षाची ताकद कायम असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या ज्या जागा ज्या पक्षाकडे आहेत, त्या जागा त्या पक्षाने लढवाव्यात, असा प्रस्ताव कॉंग्रेसकडे दिला आहे. त्यावर त्यांचे उत्तर एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच ताकदवान नेत्यांचा धसका घेणाऱ्या काही पक्षांनी सातत्याने राष्ट्रवादीसंदर्भात गोंधळाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे; पण कोकणात भास्कर जाधव हे आमचे मजबूत नेते असून, त्यांच्या नेतृत्वाखाली तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवत आहे. त्यामुळे कोकणातील एक विद्यमान आमदार, मोठा नेता भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांत काहीच तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आमचे विविध जिल्ह्यांतील नेते प्रत्येक ठिकाणी समविचारी पक्षांबरोबर युती-आघाडी करण्याची चर्चा करत आहेत. अर्ज भरण्याचा अखेरचा दिनांक 29 ऑक्‍टोबर आहे. त्यानंतरच राज्यातील कॉंग्रेस वा अन्य मित्रपक्षांबरोबरच्या आघाडीचे चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. सध्या विधान परिषदेच्या सहा जागांपैकी राष्ट्रवादीकडे चार जागा असून, कॉंग्रेसकडे एक आहे. त्यापैकी कॉंग्रेसने दोन जागा लढवाव्यात व राष्ट्रवादीने चार जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर. आर. पाटील यांची कन्या युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा
दिवंगत आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची युवती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्‍ती करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आर. आर. पाटील यांनी सांभाळली होती. आता स्मिता पाटील यांच्या नियुक्‍तीमुळे सांगली जिल्ह्याला पक्षाने झुकते माप दिल्याची चर्चा राष्ट्रवादीत आहे. दरम्यान, पक्षाच्या बळकटीकरणाबरोबरच विविध उपक्रम राबविण्याचा स्मिता यांनी संकल्प सोडला आहे.

Web Title: NCP still strong in Kokan, says Sunil Tatkare