राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरावर विधानसभा निवडणुकीत भाजपने चढाई करून राष्ट्रवादीचा पाडाव केला. ऐरोलीतून गणेश नाईक आणि बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांच्या विजयामुळे नवी मुंबई पूर्णपणे भाजपमय झाली आहे.

नवी मुंबई : एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरावर विधानसभा निवडणुकीत भाजपने चढाई करून राष्ट्रवादीचा पाडाव केला. ऐरोलीतून गणेश नाईक आणि बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांच्या विजयामुळे नवी मुंबई पूर्णपणे भाजपमय झाली आहे. या दोघांच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित आघाडीचा पुरता धुव्वा उडाला; मात्र मनसेच्या मताधिक्‍यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. 

बेलापूरची जागा नक्की कोणाच्या खिशात, यावरून महायुतीचा तिढा ताणला गेला होता. परंतु उमेदवारीची माळ मंदा म्हात्रेंच्या गळात पडल्याने त्यांचा हा पहिला विजय मानला जात होता. उमेदवारी न मिळाल्याने निराश  शिवसैनिकांची राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या उमेदवाराला छुपी मदत तर भाजपात आलेल्या काही नाईकसमर्थक नगरसेवक व नेत्यांनीही बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे म्हात्रे यांना या निवडणुकीत फटका बसणार, अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र, म्हात्रे यांनी त्यांकडे दुर्लक्ष करीत प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला. त्यामुळे म्हात्रे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशोक गावडेंनी मंदा म्हात्रे यांना कडवी झुंज दिली.

ऐरोलीत बलाढ्य उमेदवार असलेल्या गणेश नाईक यांच्यासमोर राष्ट्रवादीचे गणेश नाईक, मनसेचे निलेश बाणखेले, वंचितचे प्रकाश ढाकणे यांचा निभाव लागला नाही.
मनसेने यंदा गजानन आहे, या घोषवाक्‍यावर उमेदवार गजानन काळे यांचा प्रचार समाजमाध्यमांपासून, कॉफी टेबल माध्यमांतून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला; मात्र मतदारांनी काळे यांच्या पदरात २७ हजार ६१८ मते टाकली. गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा मनसेच्या काळे व ऐरोलीतील नीलेश बानखेले यांना अधिक मते मिळाली. २२ हजार ६९२ मते पाहता मनसेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही मनसेकरिता चांगली बाब असून, लोकप्रियता वाढत असल्याची पोचपावती आहे.

मिळालेल्या कमी वेळात खूप काही करून दाखवले. जे पाच वर्षे आमदार राहिले आहेत, अशा आमदारांना कडवे आव्हान दिले. हाच माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. यापुढे जनतेच्या कामासाठी सदैव झटत राहणार आहे. तसेच आगामी निवडणुकीत पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. 
- अशोक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस, उमेदवार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's fort has collapsed