शेतीच्या समृद्धीसाठी आधुनिकता आणि विज्ञाननिष्ठतेची गरज : पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

नवी मुंबई : शेती हा आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आहे; मात्र जगाच्या दोन टक्के लोकसंख्या असलेल्या देशातील लोकांच्या भूकेचा प्रश्‍न सोडवायचा असेल तर शेती व्यवसायात बदल करून आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ शेती केली पाहिजे. तरच या देशातील शेती समृद्ध होईल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी वाशी येथे केले. 

नवी मुंबई : शेती हा आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आहे; मात्र जगाच्या दोन टक्के लोकसंख्या असलेल्या देशातील लोकांच्या भूकेचा प्रश्‍न सोडवायचा असेल तर शेती व्यवसायात बदल करून आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ शेती केली पाहिजे. तरच या देशातील शेती समृद्ध होईल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी वाशी येथे केले. 

रयत शिक्षण संस्था सातारा आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) कॉलेज येथे तीन दिवसीय रयत विज्ञान परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते म्हणाले, शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यामुळे शेती व्यवसायात विज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता असून, विज्ञानाशिवाय प्रगती नाही. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी कशी येईल, यासाठी रयतसारख्या संस्थेने पुढाकार घेऊन विज्ञानावर निष्ठा ठेवणारी नवीन पिढीही तयार करणे गरजेचे आहे.

तसेच समाजासमोर, देशासमोर जी आव्हाने येत आहेत, त्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी विज्ञान परिषदेसारखे उपक्रम हाती घेणे गरजेचे असल्याचे या वेळी पवार म्हणाले. याप्रसंगी पुणे येथील सायन्स ऍन्ड टेक्‍नोलॉजी पार्कचे डायरेक्‍टर जनरल डॉ. राजेंद्र जगदाळे, माजी मंत्री आमदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार बाळाराम ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

विज्ञानावर आधारित नवी पिढी हवी 

सध्या भगवी वस्त्रे धारण करून बुवाबाजी आणि चमत्कार करणाऱ्यांना समाजात प्रतिष्ठा मिळू लागली आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच रोखण्यासाठी विज्ञानावर आधारित नवीन पिढी तयार करण्याची गरज असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. 

Web Title: Need of modernity and science for prosperity of agriculture says Sharad Pawar