जीवनात यशस्वी ठरण्यासाठी धावणे आवश्‍यक : हॉल

जीवनात यशस्वी ठरण्यासाठी धावणे आवश्‍यक : हॉल

मुंबई : धावण्यामुळे शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्या आपण अधिक सक्षम बनतो. त्यामुळे मॅरेथॉनपटू जीवनाच्या कणखर प्रसंगांमध्येही कधीच हार मानत नाही. जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाऊन यशस्वी होण्यासाठी अगदी मॅरेथॉन नाही, पण एकदा तरी छोट्या-मोठ्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये नक्की भाग घ्यायला हवा, असा सल्ला जगद्विख्यात मॅरेथॉनपटू रायन हॉल याने चाहत्यांना दिला. 9 डिसेंबरला होणाऱ्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनच्या पार्श्‍वभूमीवर त्याने मुंबईत नवोदित मॅरेथॉनपटू व त्याच्या चाहत्यांसोबत संवाद साधला. 

पुणे हाफ मॅरेथॉनचा ब्रॅंड ऍम्बेसिडर असलेला रायन हा जागतिक कीर्तीचा मॅरेथॉनपटू असून त्याने स्वतः अर्ध मॅरेथॉन स्पर्धा एका तासापेक्षा कमी कालावधीत पूर्ण करून एक विक्रम रचला होता. तीन वर्षांपूर्वी व्यावसायिक मॅरेथॉन स्पर्धांमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता तो अमेरिकेतील अनेक नव्या मॅरेथॉनपटूंना प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे त्याचा बहुमोल सल्ला घेण्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणांवरून मॅरेथॉनपटू आले होते. रायननेही त्याच्या चाहत्यांना निराश न करता मॅरेथॉनच्या शारीरिक तयारीपासून अगदी खाण्याच्या सवयींबाबतचे अनुभव सांगितले. 

धावणे हा असा खेळ आहे, जो वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू करता येऊ शकतो व त्यात प्रगती करता येऊ शकते. अगदी आठवडाभर कामात व्यस्त असलेल्या व्यक्तींनीही त्यांचे काम व मॅरेथॉनची तयारी यांचे नियोजन केले, तरी तुम्ही चांगल्या स्तरावर सहभाग घेऊ शकता. तसेच सुरुवात करताना छोटे टप्पे आखून ते पूर्ण करा, असा सल्ला रायनने दिला. 

मी स्वतः मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली, त्यावेळी माझी सुरुवात एवढी चांगली नव्हती. पुढे मी या गोष्टीचा मानसिक त्रास करून घेऊ लागलो. पण त्यानंतर अनुभवाने कळाले की प्रत्येक स्पर्धेचा आनंद घेतला पाहिजे. त्यानंतर माझ्या कामगिरीमध्ये खूप सुधारणा झाली. त्यामुळे स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी त्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली पाहिजे, असेही यावेळी रायनने सांगितले. 

स्वतःशी स्पर्धा करा 

मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे सर्व स्पर्धक खडतर मेहनत घेतात, पण विजेता एकच ठरतो. त्यामुळे जिंकण्या व हरण्यावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा स्वतःच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्यात उतरा. त्यामुळे तुमच्यावरील दडपणही कमी होईल व उत्तरोत्तर तुमची प्रगतीही होईल, असे रायनने स्पर्धकांना सांगितले. नव्या धावपटूंनी एकटा सराव करण्याऐवजी मॅरेथॉन ग्रुपसोबत सराव करा. त्यातून तुमची लवकर प्रगती होईल, असेही यावेळी रायनने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com