पनवेलमधील उसरण धरण दुर्लक्षित 

पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे उसरण धरणाची झालेली दूरवस्‍था.
पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे उसरण धरणाची झालेली दूरवस्‍था.

पनवेल  : एकीकडे पनवेल परिसरातील जनता पाणीटंचाईने त्रस्त आहे, तर दुसरीकडे तालुक्‍यात पाटबंधारे विभागाकडून बांधण्यात आलेले उसरण धरण दुर्लक्षित असल्याचे पाहायला मिळत आहे. धरणात साठणाऱ्या पाण्याचा वापर होत नसल्याने धरणाचे पाणी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्‍यात धरण असूनही  देवळोली गावाला पाण्याचा वापर करता येत नसल्याने शेजारील सावळा ग्रामपंचायतीने स्वखर्चाने धरणापासून दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव तयार केला होता; मात्र प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी याला विरोध केल्याने प्रस्ताव रखडला असून ‘धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

कर्जत तालुक्‍यातील कोंढाणे धरणातील पाणी पनवेलला मिळावे, याकरिता पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत; मात्र त्याच वेळेला तालुक्‍यातील शहरापासून केवळ १० किलोमीटर दूर असलेले उसरण धरण मात्र दुर्लक्षित असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्‍यातील देवळोली ग्रामपंचायत हद्दीत पाटबंधारे विभागाकडून १९८६ मध्ये ५८ एकर जागेवर ६५ एमएलडी क्षमतेचे उसरण धरण बांधून तयार करण्यात आले.

धरणाकरिता स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असल्याने सुरुवातीच्या काळात स्थानिक शेतकऱ्यांना शेती करण्याकरिता पाटबंधारे विभागाकडून पाणी देण्यात येत होते; मात्र कालांतराने परिसरातील शेतकऱ्यांनी शेती करण्याकडे पाठ फिरवल्याने सद्यस्थितीत धरणात जमा होणारे पाणी कोणत्याही उपयोगात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या देवळोली ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी धरणाकरिता वापरण्यात आल्या आहेत तेथील ग्रामस्थ आजही पिण्याच्या पाण्याकरिता बोरवेलच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पनवेलच्या लोकप्रतिनिधींनी धरणातील पाणी मिळवण्याचा प्रयत्न करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. 

उसरण धरणात पनवेलसाठी पाणी आरक्षित असावे, याकरिता प्रयत्न सुरू आहेत. उरणचे आमदारही परिसरातील ग्रामस्थांना धरणातील पाणी मिळावे, याकरिता प्रयत्न 
करीत आहेत. 
- प्रशांत ठाकूर, आमदार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com