मिनी ट्रेनची शटल सेवा पावसाळा संपण्यापूर्वी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नेरळ-माथेरान सेवा दिवाळीदरम्यान सुरू होणार

नेरळ-माथेरान सेवा दिवाळीदरम्यान सुरू होणार
नेरळ - गेले वर्षभर बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन आणि अमन लॉज-माथेरान शटल सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. पावसाळा संपण्यापूर्वी शटल व दिवाळीदरम्यान नेरळ-माथेरान प्रवासी सेवा पूर्ववत केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली.

माथेरानची जीवनवाहिनी असलेली मिनी ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, अजय सावंत, मनोज खेडकर; तसेच नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्या शिष्टमंडळाने शर्मा यांची मुंबईतील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात भेट घेतली. किरकोळ अपघातानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने 8 मे 2016 पासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक तसेच पर्यटकांचे हाल सुरू आहेत. माथेरानला वाहनबंदी असल्याने रेल्वे ही स्वस्त व महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे, असे शिष्टमंडळाने सांगितले.

यावर शर्मा यांनी सांगितले, की या मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. हे काम वेगाने सुरू आहे. जागतिक महत्त्व असलेली मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: neral news mini train shuttle service