नेरूळ, वाशीतील रस्ते चकचकीत होणार

नेरूळ, वाशीतील रस्ते चकचकीत होणार
नेरूळ, वाशीतील रस्ते चकचकीत होणार

नवी मुंबई : गावठाणातील खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यांचा लवकरच महापालिकेतर्फे थिन व्हाईट टॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून विकास केला जाणार आहे. वाशी विभागातील वाशी गाव व जुहूगाव; तर नेरूळ विभागातील शिरवणे गाव, सारसोळे गाव व जुईपाडा या गावठाणातील रस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी वाशी विभागातील रस्त्यांवर चार कोटी ८४ लाख रुपये व नेरूळ विभागातील रस्त्यांवर सुमारे सात कोटींचा खर्च केला जाणार आहे. 

अनेक वर्षांपूर्वी महापालिकेतर्फे डांबरीकरणाद्वारे या रस्त्यांचा विकास करण्यात आला होता. मात्र, मुसळधार पाऊस व सततच्या वाहनांमुळे हे रस्ते फार काळ टीकाव धरू शकले नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडून अक्षरशः चाळण होते. यंदाच्या पावसाळ्यातही बऱ्याच ठिकाणी रस्ते खचले होते; तर काही रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यामुळे गावठाणात ये-जा करण्यासाठी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. गावांमधील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध व्हावेत, याकरिता अभियांत्रिकी विभागामार्फत थिन व्हाईट टॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित काँक्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत. या रस्त्यांवर वारंवार खर्च करण्याची आवश्‍यकता भासत नाही. रस्त्याला भेगा व खड्डे पडत नाहीत. त्या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे कामही संबंधित कंत्राटदारामार्फत केले जाते. त्यावर पुन्हा वेगळा खर्च प्रशासनाला करावा लागत नाही. वाशी व जुहू गावातील रस्त्यांचे थिन व्हाईट टॅपिंगद्वारे काँक्रीटीकरण केले जाणार आहे; तर नेरूळ विभागातील शिरवणे गाव, सारसोळे व जुईपाडा गावांतील रस्त्यांचा कायापलट होणार आहे. त्यासाठी ११ कोटी ८४ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

थिन व्हाइट टॅपिंग म्हणजे काय?
थिन व्हाइट टॅपिंग तंत्रज्ञान हे काँक्रीटीकरण प्रकारातील रस्ते बांधणीची एक पद्धत आहे. या पद्धतीने तयार केले जाणारे रस्ते पांढरे शुभ्र रंगाचे असतात. तसेच या रस्त्यांमध्ये पावसाचे पाणी झिरपत नाही. हे रस्ते टणक असून, लहान आकाराच्या वाहनांसाठी वापरले जातात. हा रस्ता अधिक काळ टिकणारा असतो.

यशस्वी प्रयोग
याआधी देखील शहरातील काही निवडक रस्ते थिन व्हाईट टॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित काँक्रीटीकरण करून प्रयोग केला होता. हे रस्ते तयार केल्यावर त्याचा दर्जा तपासण्यात आला. महापौर जयवंत सुतार यांच्या विभागात केलेला पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता नवी मुंबईतील गावठाणांमध्ये सर्व ठिकाणी राबवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com