नेरूळमधील भूखंड महापालिका विकसित करणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

बेलापूर - नेरूळ सेक्‍टर 26 मधील भूखंड महापालिकेकडे हस्तांतरीत झाला आहे. या भूखंडावर नेरूळ आणि परिसरातील खेळाडू खेळण्यासाठी येतात. 2015 मध्ये महापालिकेने श्री बामणदेव, श्री झोटिंग देव मैदान असे त्यांचे नामकरण केले आहे. या मैदानावर मोठ्या प्रमाणात डेब्रिज, गवत असल्याने खेळाडूंना अडचणी येतात. त्यामुळे महापालिकेने या भूखंडाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक खेळाडूंना न्याय मिळणार आहे. 

शहराची निर्मिती करताना सिडकोने शाळा, महाविद्यालये, उद्याने, मैदाने, समाज मंदिर, व्यायामशाळा, स्मशानभूमी आदींसाठी भूखंड आरक्षित ठेवले आहेत. परंतु, गावांच्या आवारात सामाजिक सुविधांचे भूखंड आरक्षित ठेवले नसल्याने प्रकल्पग्रस्त तरुणांना खेळण्यासाठी शहरातील इतर मैदानांचा वापर करावा लागत आहे. नेरूळ सेक्‍टर 26 मधील भूखंडावर परिसरातील मुले अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळतात. नेरूळ युवा संघाच्या वतीने या भूखंडावर पडलेले डेब्रिज, कचरा श्रमदानातून अनेक वेळा हटवण्यात आला; परंतु या मैदानाला आलेला बकालपणा, वारंवार टाकले जाणारे डेब्रिज, कचरा, गवत, मैदानावरील खड्डे यामुळे तेथे खेळताना खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने हे मैदान विकसित करावे, अशी मागणी केली जात होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने या भूखंडाचा विकास करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या भूखंडाचा विकास करताना तेथे डेब्रिज टाकले जाऊ नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून प्रवेशद्वारही बनवले जाणार आहे. त्यामुळे या भूखंडाचा बकालपणा नष्ट होऊन त्याचे रूपांतर चांगल्या मैदानात होणार आहे. 

नेरूळ गावातील खेळाडू या मैदानावर खेळतात. त्यावर पडलेले डेब्रिज आणि कचरा श्रमदानातून काढला जातो; परंतु सतत टाकले जाणारे डेब्रिज आणि कचरा यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या. त्यामुळे मैदानाचा विकास करावा, अशी मागणी माजी मंत्री गणेश नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर जयवंत सुतार आणि नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्याकडे केली होती. तिला यश आल्याने खेळाडूंना न्याय मिळाला आहे. 
- जयंत म्हात्रे, अध्यक्ष, नेरूळ युवा संघ, नेरूळ गाव 

Web Title: Neruls plot to develop the municipal corporation